
मुंबई : सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपात असते असं खळबळजनक विधान भाजप नेते नारायण राणे (Narayan rane)यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चोख उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ‘दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे,’ असं प्रत्युत्तर ट्विटरद्वारे जयंत पाटील यांनी दिलं आहे.
‘माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील 5 वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील हे आपल्या उपरोधिक टोल्यांसाठी ओळखले जातात. चिमटे काढत विरोधकांचा समाचार घेण्यात ते कोणतीही कसर ठेवत नाहीत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या याच शैलीत भाजपला फटकारलं आहे.
दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे. @NCPspeaks
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 30, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला