माझ्या आईचं पत्र हरवलं…

Shailendra Paranjapeलहानपणी एक खेळ खेळायचो, त्याचं नाव होतं- माझ्या आईचं पत्र हरवलं. माझ्या आईचं पत्र हरवलं, असं म्हणत ज्याच्यावर राज्य असेल तो गोलाकार बसलेल्या सवंगड्यांच्या भोवती चक्कर मारत असे. चक्कर मारताना तो अचानक हातातला रुमाल एखाद्याच्या पाठीमागे टाकत असे आणि ज्याच्या मागे तो टाकलाय त्यानं पाठलाग करून रुमाल टाकणाऱ्याला बाद करायचं, असा हा खेळ. या खेळाची आठवण कालच्या एका राजकीय बातमीमुळे झालीय. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रानं क्रांती घडवली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना संगणकयुग देशात आणण्याचं श्रेय दिलं जातं. हमे देखना है, असं सतत सांगणारे राजीव गांधी संगणकाचा वापर वाढावा, यासाठी आग्रही होते. त्यातूनच आता तर संगणकही भूतकाळात जमा होऊन मोबाईल्सनी बाकी सर्व गॅजेट्सना मागं टाकलंय. फेसबुक, ई-मेल, एसएमएसच्या पुढे जाऊन व्हाट्स अप, लिन्क्ड इननं आणखी पुढे जात कोणतीही व्यक्ती आता काय करतेय, हेही ती व्यक्ती पुरेशी सोशल मीडिया अँडिक्ट असल्यास सहज समजू शकते. त्यामुळे सतत ऑनलाईन राहण्याच्या काळात एका पत्रानं राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिलीय. विशेष म्हणजे संगणक क्रांती आणण्याचं श्रेय ज्यांना जातं त्या राजीव गांधींच्या पत्नी आणि सध्या तरी काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या सोनिया गांधी यांनी लिहिलंय. ते पत्र लिहिलंय कोणाला तर मनानं कलाकार असलेल्या छायाचित्रकार आणि शरीरानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नात्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरे यांना.

आता इतकी सारी विशेषणं आठवण्याचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे सोनियाजींची नक्कल जाहीर सभांमध्ये करायचे, ते या पत्रामुळं आठवलं. उदर आप लोग धूप में खडे है, असं लिहून दिलेलं भाषण सोनिया गांधी वाचतात आणि प्रत्यक्षात मात्र पाऊस सुरू झालेला असतो, असं त्यांच्या खास शैलीत सांगून बाळासाहेब ठाकरे सोनिया गांधी यांची खिल्ली उडवत असत. पण राजकारणात कायमस्वरूपी मित्र आणि शत्रू नसतात. ते बदलत राहतात, याचं प्रत्यंतर कायम येत राहतं. तसंच ते आताही आलंय. सोनिया गांधी यांचा कॉंग्रेस पक्ष उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या महाआघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी पत्र लिहून त्यांना एक प्रकारे राजधर्माच्या आचरणाचीच आठवण करून दिलीय. किमान समान कार्यक्रम ज्याच्या आधारे तीन भिन्न प्रवृत्तींच्या विचारधारांचे पक्ष सत्तेत एकत्र आलेत.

त्याची आठवण सोनिया गांधी यांनी उद्धवजींना करून दिलीय. शाळेत हेडमास्तरांनी बोलावले की, ते कधीच कौतुकासाठी नसते; पण तरीही त्यांच्या केबिनमधून बाहेर येताना हात मागे बांधून यावे लागते आणि विशेष काहीच झालेले नाही, असे दाखवावे लागते. त्याच पद्धतीने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे दिव्यदृष्टी (जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे पत्रकार म्हणून दिव्यदृष्टी) संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शेतकऱ्यांचे नेते आणि या महाआघाडी तीनचाकी रिक्षाचे उत्पादक शरद पवार यांनी आपल्या मुलाबद्दल व्यक्त केलेले मत ऐकून व्यथित होऊन सोनिया गांधी यांनी उद्धवजींना पत्र लिहिले नाही ना, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या नाराज गटात आहे म्हणे. दुसरीकडे या पत्रामुळे आघाडी सरकारमधील बिघाडी समोर आल्याचा दावा भाजपाचे आशिष शेलार यांनी केलाय. या खेळातल्या सर्व खेळाडूंच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच येतील. पण माझ्या आईचं पत्र हरवलं, या खेळाप्रमाणे आता कोण कोणाला औट करतोय, ते बघायचं.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER