मला नियम माहीत आहेत; जयंत पाटलांनी नवाब मलिक याना फटकारले

- 'कॅग'च्या अहवालाबाबत मतभेद

नागपूर : ‘कॅग’च्या अहवालात २०१८ पर्यंत झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे न आल्याने ६६ हजार कोटींच्या अफरातफरीचा संशय व्यक्त केला आहे. याला घोटाळा म्हणता येणार नाही, असे मत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर, दुसरे मंत्री नवाब मलिक यांनी हा अहवाल चिकित्सा समितीकडे पाठवून निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी मी अर्थमंत्री आहे मला नियम माहीत आहेत असे उत्तर देऊन मालिकांना फटकारले.

कॅगचा अहवाल विधिमंडळात सादर झाल्यानंतर विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर अर्थमंत्री जयंत पाटील यांनी घोटाळा म्हणता येणार नाही, असा दुजोरा दिला पण नबाब मलिक घोटाळ्याचा आग्रह सोडायला तयार नव्हते त्यावर जयंत पाटील यांनी त्यांना अधिकारक्षेत्राची जाणीव देऊन समज दिली.

फडणवीस म्हणाले, ‘कॅगच्या अहवालाचा चुकीचा अर्थ काढून आरोप केले जात आहे. उपयोगिता प्रमाणपत्रे दिली नाही याचा अर्थ घोटाळा झाला असे होत नाही. अकाउंट पद्धतीच्या दोषामुळे हे आकडे अहवालात दिसत आहेत. प्रमाणपत्रे वेळेवर न आल्याने वित्त आणि नियोजन विभागात मेळ लागत नाही. यापूर्वीही म्हणजे २००९ मध्ये ४१,५३७ कोटी, २०१० मध्ये ५३,५३९ कोटी, २०११ मध्ये ७३,१९८ कोटी, २०१२ मध्ये ८८,२४० कोटी, २०१३ मध्ये ८२,९०० कोटी, २०१४ मध्ये ६८, ६५९ कोटी, २०१५ मध्ये ६१,१४८ कोटी, २०१६ मध्ये ६३,०८९, २०१७ मध्ये ६०,३२१ कोटी आणि २०१८ मध्ये ६५,६२१ कोटींची प्रमाणपत्रे दिली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.’ त्यावर अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ज्या अधिकाऱ्यांनी उपयोगिता प्रमाणपत्रे दिली नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या असून यात घोटाळा झाला आहे असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले.