भ्रष्ट मोपलवारांच्या वादग्रस्त संवादाच्या २६ ऑडिओ क्लीप माझ्याकडे – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

अकोला: मुख्यमंत्र्यांची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप असलेले विवादित सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांच्या वादग्रस्त संवादाच्या २६ ऑडिओ क्लीप माझ्याकडे आहेत. यातून मोठा भ्रष्टाचार समोर येणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज अकोल्यात आले असता पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. दरम्यान या ऑडिओ क्लिप आपल्यापर्यंत कश्या पोहचल्या असा प्रश्न विचारला असता त्यांनी भाजप आमदार अनिल गोटेंनी या क्लीप आपल्याला पुरविल्याची माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती देतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “तेलगी प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या मोपलवारांवर मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी सोपविली. त्यांची घरगुती वादावरुनची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. पण भाजपचे विद्यमान आमदार अनिल गोटेंनी मोपलवारांच्या २६ ऑडिओ क्लीप मला दिल्या. भाजप सरकारकडून मोपलवारांवर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने, त्यांनी या सर्व क्लीप माझ्याकडे सोपवल्या असल्याचा,” दावाही चव्हाण यांनी यावेळी केला. दरम्यान, राधेश्याम मोपलवार यांची कथित ऑडिओ क्लिप आली होती. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु आहे. आता पृथ्वीराज चव्हाणांनी आणखी आरोप केल्यानं मोपलवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता परत एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लीपची सत्यता अजूनपर्यंत कुठल्याही यंत्रणेने तपासलेली नाही.