यावेळी मी विधानसभेत नसेल याची खंत आयुष्यभर राहील : एकनाथ खडसे

Eknath Khadse

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक उरले असताना या राज्यात पुन्हा भाजप-सेनेचे सरकारच येणार असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला असून यावेळी विधानसभेत मी नसेल याची आयुष्यभर खंत राहील असेही भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे.

राज्यातील मजबूत विरोधीपक्ष नसल्याचा आम्हाला निश्चितच फायदा मिळेल, असे सांगताना खडसे म्हणाले, “भाजपाला १४० पेक्षा अधिक जागा मिळतील असा मला विश्वास आहे. विधानसभेत जाता आले असत तर मला आनंद झाला असता. विधानसभेशी माझे जवळचे नाते असल्याने नव्या विधानसभेत मी नसेल याची खंत आयुष्यभर राहील, असे खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

आजवर मी जनतेच्या विविध प्रश्नांवर सभागृहात आक्रमकपणे प्रश्न मांडले आहेत, माझ्या राजकीय जीवनातील मोठा काळ विरोधीपक्षाचा आमदार म्हणून घालवला आहे. त्यामुळे माझ्यासाठी विधानसभा जवळची राहिली आहे. आक्रमकपणे प्रश्न मांडताना मला सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. तेव्हा भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनीही माझ्या या आक्रमकपणाचे कौतुक केले होते, अशी आठवणही खडसेंनी यावेळी सांगितली. मी नव्या सभागृहात नसल्याची खंत वाटत असली तरी नवे लोक इथे येतील याचा आनंदच असलयाचेही खडसे यावेळी म्हणाले.