सरकारचे सल्लागार कोण हे समजत नाही, सगळं बुडवायला निघाले- फडणवीस

Devendra Fadnavis

नागपूर :- कांजूर मार्गमध्ये मेट्रो कारशेड (Kanjurmarg Metro Car Shed) उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहेत  आणि या सरकारलाही. नुसता पोरखेळ चालला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडची जागा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला हलवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपुरात (Nagpur) बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, बुलेट ट्रेन स्टेशनची जागा सरकार मेट्रो कारशेडसाठी घेण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली का, माहिती नाही; परंतु हा पोरखेळ चालवला आहे. बीकेसीची जागा ही प्राईज लँड आहे. १८०० कोटी रुपये प्रतिहेक्टर खर्च आला. त्यामुळे २५ हेक्टर जागेसाठी २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. बुलेट ट्रेनच्या स्टेशनची रचना जमिनीच्या तीन लेव्हल खाली करण्यात आली आहे.

तर जमिनीवर केवळ ५०० मीटर जागा व्यापली जाईल. आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या इमारती जमिनीवर असतील. बुलेट ट्रेनचं स्टेशन जमिनीच्या आत करायचं ठरवलं तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. आता ५०० कोटींमध्ये होणाऱ्या डेपोला जर सहा हजार कोटी लागले तर तो भुर्दंड बसेलच; पण त्याचा जो वार्षिक देखरेखीचा खर्च आहे तोदेखील जवळजवळ पाच ते सहा पट अधिक असेल. त्यामुळे हे शक्य नाही.

हे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी न्यायव्यवस्थेवर केलेल्या आरोपावर फडणवीसांनी टीका केली. सरकारने चुकीचे काम करायचे आणि न्यायालयाने चूक दाखवल्यावर न्यायव्यवस्थेला दोष द्यायचा, हे न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मेट्रो कारशेड बीकेसीत स्थानांतरित करणे अव्यवहार्य – फडणवीस यांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER