पंतप्रधानांनी रडण्याचे नाटक केले असं मला वाटत नाही – गुलामनबी आझाद

Narendra Modi - Ghulam Nabi Azad

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले. आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi,) भावुक झाले होते. आझाद हे आपले चांगले मित्र असल्याचं मोदींनी सभागृहात सांगितलं आणि एवढेच काय तर गुलाम नबी आझाद यांची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी यांना अश्रुही आवरता आले नाहीत.

यानंतर विरोधकांनी पंतप्रधानांचे आझादांसाठी असे भरसभागृहात भावूक होणे यावर टीका केली. आझाद यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावूक होण्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी टोला लगावला होता. त्यावरही आझाद यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे. या प्रकारची टीका करणारी लोकं मोदींना ओळखत नाहीत. एक काँग्रेसचा नेता जात आहे तर त्यांना त्रास करुन घ्यायची काय गरज आहे? ते माझ्याबद्दल जे बोलले ती त्यांची भावना होती. ती राजकारणाच्या पलिकडं एक माणूस म्हणून व्यक्त केलेली भावना होती. पंतप्रधानांनी रडण्याचं नाटक केलं असं मला वाटत नाही,’ असं आझाद यांनी सांगितले.

मोदींच्या स्तुतीनंतर लगेच आझाद आता भाजपत जाणार अशी चर्चा रंगली आहे. या चर्चेवर गुलामनबी आझाद यांनी माध्यमांना एका मुलाखतीतून उत्तर दिले आहे.

‘ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्या दिवशी मी भाजपात प्रवेश करेन असं स्पष्ट केलं. भाजपच काय मी त्या दिवशी कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करेन,’’ असं आझाद यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मोदींसोबतच्या आठवणी सांगताना आझाद म्हणाले, नरेंद्र मोदी आणि आपली 1990 च्या दशकापासून ओळख आहे. त्यावेळी आम्ही दोघंही सरचिटणीस होतो आणि टीव्ही शो मध्ये एकमेकांच्या विरुद्ध वादविवाद करत असू. आम्ही कार्यक्रमाच्या दरम्यान एकमेकांशी जोरदार वाद केले. मात्र ज्या दिवशी आम्ही लवकर स्टुडिओमध्ये यायचो त्या दिवशी एकत्र चहा देखील घेतला आहे. सरचिटणीस नंतर आम्ही एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून ओळखू लागलो. काही दिवसांनी मी आरोग्य मंत्री झालो. त्यावेळी देखील मोदींची वेगवेगळ्या बैठकांमध्ये भेट होत असे. आम्ही दर 10-15 दिवसांनी एकमेकांशी चर्चा केलेली आहे. आमचं नातं हे खूप जुनं आहे,’’ अशी आठवण आझाद यांनी यावेळी सांगितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER