‘मी दिलदार, त्यावेळी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले होते’; खडसेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadavis-EknathKhadse

जळगाव : भारतीय जनता पक्षातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्याबद्दल नाराजी दर्शवताना खडसे यांनी चक्क त्यांच्या जातीचा उल्लेख केला. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, असे विधान खडसे यांनी मुक्ताईनगरमधील एका कार्यक्रमात केले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, हा नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे, तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला, असे खडसे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असंही दवेंनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER