१० ऑक्टोबरच्या ‘महाराष्ट्र बंद’ला माझा पाठिंबा नाही – संभाजीराजे

- मराठा आरक्षणावरून समाजात दोन गट

sambhaji raje chhatrapati

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आंदोलन करत आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीने १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदला माझा पाठिंबा नाही, असे खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही. कोरोनाची  साथ सुरू  आहे.  त्यामुळे बंद नकोच. बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य करावा लागतो. स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज दुःखी आहे.

सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत समाजाला ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षण घ्यावे असे मंत्री अशोक चव्हाणांनी मला फोन करून सांगितले. यास आम्ही नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. ईडब्ल्यूएस आरक्षण एका जातीसाठी नाही, ते सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. जर हे आरक्षण घेतले तर सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा कोणताही दावा राहणार नाही म्हणून मी त्यांना ईडब्ल्यूएसचे आरक्षण घेणे धोक्याचे असल्याचे सांगितले, अशी माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली.

काय म्हणाले होते सुरेश पाटील?

ईडब्ल्यूएसचा मराठा समाजाला फायदा करून घेतला पाहिजे असा ठराव गोलमेज परिषदेत पास करून घेतला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती कोर्टाकडून उठत नाही, तोपर्यंत फायदा मिळाला पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली होती. छत्रपती संभाजीराजेंनी काही संघटनांचे ऐकून ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला नको, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली, ती भूमिका चूक आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षणात कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असल्याने समाज आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाजासमोरील ताट काढून घेतले आहे.  त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. मराठा गोलमेज परिषदेने  १० ऑक्टोबर रोजी    ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दोन्ही राजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करू नये

संभाजी महाराज हे राजे आहेत, ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी सगळ्या संघटनांना बोलावून त्यांची मते जाणून घ्यायला हवी होती; परंतु काही संघटनांचे ऐकून गैरसमज झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ते मत मांडले आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असे सामान्य मराठा म्हणून मला वाटते. ते मराठा आरक्षणात भाग घेतात तिथपर्यंत ठीक आहे. मराठा समाजाचं नेतृत्व एखाद्या राजाकडे गेले, तर धनगर समाज, ओबीसी, भटके-विमुक्त, इतर समाज आले तर त्यांचेही नेतृत्व त्यांना करावे लागेल. प्रत्येक संघटना आपापल्या समाजाचे प्रश्न मांडत असतात. राजांनी कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व समाजाचे नेतृत्व करावे म्हणून ते करत आहेत. त्यांची भूमिका योग्य आहे, आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही पार पाडत आहोत, असे सुरेश पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER