राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठविल्याबद्दल माहिती नाही- मुख्यमंत्री

CM Fadnavis-Raj Thackeray

मुंबई : ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कशासाठी नोटीस पाठवली आहे याबाबत मला काहीच माहिती नसून मी याबाबत प्रसारमाध्यमांतूनच ऐकले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ईडी ही स्वतंत्र संस्था असून तिचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या मुद्यावर मी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि राज यांना नोटीस आली असेल तर त्यांनी उत्तर द्यायला हवे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंना ईडीची नोटीस म्हणजे सुडबूद्धीचं राजकारण – राजू शेट्टी

काही चूक असेल तर राज यांनी घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीने नोटीस बजावली असून त्यांना येत्या २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

यावरून मनसेसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. ईव्हीएमविरोधी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन राज यांनी केल्यामुळे सूडबुद्धीने ही नोटीस पाठविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले. ते म्हणाले, राज यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे हे मी माध्यमातून ऐकले आहे. त्याबाबत मला काहीच माहीत नाही.

ईडीच्या नोटिशीनंतर मनसेनं ठाणे बंदचा इशारा दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कायदा हातात घेणाऱ्यांना; मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही त्यांनी दिला.