
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात शेतकरी मेळावा घेतल्यानंतर त्यांनी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. कोरोना (Corona) महामारीपासून वाचण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. “मोदींचं एक वाक्य आहे की ‘दो गज की दुरी’ मात्र मीही पाळत नाही आणि तुम्हीही पाळत नाही. असं असलं तरी आपण काळजी घेण्याची आवश्यक आहे. आता इंग्लंडला पुन्हा 35 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला गेला,” असं सांगत शरद पवार यांनी नागरिकांना संसर्गाच्या धोक्याची जाणीव करुन दिली.
यावेळी त्यांनी सिरम कंपनीच्या संस्थापकांनी विनंती करुनही आपण कोरोना लस न घेतल्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “मला सिरमच्या संस्थापकांनी कोरोना लस घेण्यास सांगितले, पण मी त्यांना आधी नगरला जाऊन येतो आणि तेथील परिस्थिती पाहून नंतर गरज वाटल्यास थेट तुमच्याकडे येण्याचे संगितले आहे. सिरमला आग लागली मात्र सुदैवाने कोरोनाच्या औषधांचे नुकसान झालेलं नाही. सिरमचे संस्थापक माझे मित्र आहेत. ते काही दिवसांपूर्वी म्हणाले बीसीजीचे इंजक्शन घे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल. आता पुन्हा गेलो होतो तर कोरोना लस घे म्हणाले. मात्र, मी सांगितले आधी नगरला जाऊन येतो तिथली परिस्थिती पाहतो, नंतर गरज वाटल्यास थेट तुझ्याकडे येतो.”
शरद पवार म्हणाले, एके काळी उपचारासाठी अन्य ठिकाणी जावे लागत होते, तर 50 वर्षांपूर्वी फक्त श्रीरामपूर येथे रुग्णालय होते. आता अनेक रुग्णालये झाली आहेत. कोरोना काळात एक महिना घराबाहेर पडू नका असे आदेश काढण्यात आले होते. नंतर ते वाढवण्यात आले. त्यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. ज्या काळात फार कुणी घराबाहेर पडत नव्हतं, तेव्हा मी राज्याचा दौरा केला आणि सर्व वैद्यकीय डॉक्टर एकत्र केले. तेव्हा मला खासगी डॉक्टर म्हणायचे फिरू नका, पण मी म्हणालो सर्व लोक चिंतेत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला