ममतादीदी असा ‘खेला’ करतील वाटलं नव्हतं; डायरेक्ट ॲक्शन डेची आठवण झाली – जे. पी. नड्डा

JP Nadda - Mamata Banerjee - Maharashtra Today

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराने देशाचं विभाजन आणि डायरेक्ट ॲक्शन डेची आठवण ताजी झाली. ममता बॅनर्जी यांना जनतेने सत्तेसाठी कौल दिला असला तरी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात रक्ताने माखलेल्या हातांनी करत आहेत, अशा शब्दात नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा बंगालच्या दौऱ्यावर आहेत. हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या ममता बॅनर्जी यांनी हिंसाचाराच्या घटनांबाबत ज्या प्रकारे मौन बाळगलं आहे, त्यावरून या सर्व प्रकाराला त्यांची सहमती असल्याचं दिसत आहे. ममता बॅनर्जी खेला होबे म्हणत होत्या; पण त्या असा खेला करतील असं माहिती नव्हतं. हिंसाचारामुळे जवळपास ८० हजार ते १ लाख लोकांना घर सोडावे लागले. ममता बॅनर्जी म्हणतात, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात हिंसाचार झाला नाही. ही काय थट्टा आहे का? असा प्रश्न नड्डा यांनी उपस्थित केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी नसल्याचं सांगतानाच हिंसाचाराचा विरोध आम्ही लोकशाही पद्धतीने करू, असं नड्डा म्हणाले.

निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवारावर हल्ले करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे महिलांवरही हल्ले करण्यात आले. महिलांसोबत दुष्कर्म केलं. आज पश्चिम बंगालमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्या सर्वाधिक असुरक्षित आहेत. आम्ही जनादेशाचा आदर करतो, मात्र जनादेशामुळे सत्य लपून राहात नाही. लुटपाट चालू आहे. जेव्हा मी १९४६ ची गोष्ट करतो, तेव्हाही रक्ताचे पाट वाहिले होते. आजही २ मेनंतर पश्चिम बंगालमध्ये रक्त पाहायला मिळत आहे. मी हिंसाचाराचा निषेध करतो. आम्ही असहिष्णुतेचे विचार नष्ट करू, असा विश्वासही नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button