मी पुन्हा आलो

Visraj Kulkarni

‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य राजकीय क्षेत्रात प्रचंड व्हायरल झालं. मग काय, सोशल मीडियावर हे वाक्य अनेक अर्थानं बोललं गेलं. आपल्या मराठी मालिका इंडस्ट्रीतील जे कलाकार नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यांच्यासाठी तर असे नेटकऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या शब्दांचं भांडारच असतं. मालिकेतील बिहाइंड द सीनपासून पडद्यामागचे धमाल किस्से चाहत्यांशी शेअर करत कायम सोशल मीडियावर सक्रिय असलेले कलाकार जेव्हा अचानक या सोशल मीडिया पेजवरून गायब होतात तेव्हा काळजाचा ठोका चुकतोच. गेल्या दोन आठवड्यांपासून अभिनेता विराजस कुलकर्णीच्या चाहत्यांनाही अशीच चुटपूट लागली होती. पण आता, मी पुन्हा आलो, असे म्हणत विराजसने त्याचे ऑनलाईन आणि ऑन स्क्रीन दर्शन दिले आहे.

‘माझा होशील ना’ या पहिल्याच मालिकेतून हिट झालेला विराजस हा जितका या मालिकेतून रोज भेटतो त्याच्या कैकपटीने त्याच्या इन्स्टा पेजवरून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, कवी आणि जादूगार अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असलेला विराजस ‘माझा होशील ना’ या मालिकेत आदित्यची भूमिका करत आहे. त्याची पुण्यातील मैत्रीण आणि अभिनयाच्या शाळेतील सहकलाकार गौतमी देशपांडेच त्याची नायिका असल्यामुळे त्यांची केमिस्ट्रीही भन्नाट जुळून आली आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली असताना दिवाळीच्या सुटीसाठी कलाकारांना त्यांच्या घरी जाता यावे म्हणून मालिकेतील एपिसोड पॅक करण्याची लगबग सुरू होती. पण दिवाळीच्या सुटीसाठी पुण्याच्या घरी गेलेला विराजस मात्र दिवाळीनंतर सेटवर आलाच नाही. अर्थात पॅक असल्यामुळे तो मालिकेत दिसला; पण सोशल मीडियावर रोज फोटो, कमेंट, व्हिडीओ घेऊन येणाऱ्या विराजसचे पेज दोन आठवडे अपडेटच नव्हते. मग जेव्हा भाऊबीजेच्या दिवशी जवळपास दहा फुटांवरून विराजसचे औक्षण करणारी बहीण आणि रूमबाहेर तोंडाला मास्क लावून, अशक्तपणा चेहऱ्यावर दिसत असलेल्या विराजसला पाहून चाहत्यांनी काय ओळखायचे ते ओळखले. विराजसला कोरोनाची लागण झाल्याने तो घरी क्वारंटाईन होता.

विराजसने कोरोनावर मात केल्यानंतरची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. अख्खी दिवाळी आजारपणाने खाल्ली, असे म्हणत त्याने कोरोनातून बाहेर पडून आता शूटला सुरुवात केल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. हातात कोरोना विषाणूच्या आकाराचा बॉल घेतलेला त्याचा फोटोही व्हायरल झाला. इतक्या लांबून आज बहिणीकडून ओवाळून घ्यावे लागत आहे असे म्हणत त्याने भाऊबीजेचा फोटोही शेअर केला होता. अशी भाऊबीज पुन्हा नको असे त्याने म्हटले होते.

आता विराजस एकदम ठणठणीत झाला असून सोशल मीडियावरही सक्रिय झाला आहे. शूटिंगच्या वेळी सेटवर होणाऱ्या गमती विराजसच्या खास शैलीत तो शूट करत असतो. गौतमी, विराजस आणि सुयशच्या भूमिकेत असलेल्या आशय यांची खूप छान मैत्री असल्याने त्यांचे अनेक किस्से चाहत्यांना विराजसकडून ऐकायला मिळत असतात. कोरोनामुळे विराजस सेटवरच आला नव्हता. त्यामुळे अशा पोस्टपासून त्याचे चाहते दुरावले होते. आजारपणात सतत विश्रांती घ्यायची होती. विराजस सांगतो, मला सोशल मीडियाचे खूप वेड आहे. हे घरी माहीत असल्यामुळे कोरोना झालेल्या काळात मला फोन वापरण्यासही आईने बंदी घातली होती. या दरम्यान खरं तर चाहत्यांचे, मित्रपरिवाराचे खूप मेसेज आले. सोशल मीडिया पेजवरही अनेक कमेंट आल्या. पण सगळ्यांना उत्तर देण्याची माझ्यात ताकद नव्हती. आता मी कोरोनाला हरवून पुन्हा आलो आहे.

विराजसची ही पहिलीच मालिका असून यापूर्वी त्याने खूप नाटके केली आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा यापेक्षा एक ट्रेंड लेखक, दिग्दर्शक, जाहिरात संकल्पक अशा अनेक ओळखीही त्याच्या आहेत. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ हे त्याचे प्रायोगिक नाटकही खूप गाजले होते. कोरोना लॉकडाऊन काळात कोरोनाबाधितांना काही दिवस एकटे राहू द्या… एकटे पाडू नका, असा संदेश देणारी आणि विराजसची आई मृणाल व वडील रुचिर यांच्यावर चित्रित झालेली जाहिरात विराजसनेच शूट केली होती. कोरोनाशी संबंधित जाहिरात करताना विराजसला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, तो कधी तरी या विळख्यात सापडेल. पण १४ दिवसांच्या काळातील हा अनुभव घेत तो पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आहे. ‘मी पुन्हा आलो’ ही त्याची हाक चाहत्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने त्याच्या ऑलटाइम फेव्हरेट सोशल मीडिया माध्यमालाच सोबत घेतले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER