गिरीश महाजनांना मी राजकारणात आणलं, त्यांनी माझी काळजी करू नये- एकनाथ खडसे

Girish Mahajan - Eknath Khadse - Maharashtra Today
Girish Mahajan - Eknath Khadse - Maharashtra Today

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केल्यानंतर खडसे यांनीदेखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. त्यांनी माझी काळजी करू नये. गिरीशभाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकतात, असं खडसे म्हणाले आहेत. तसेच गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असं मोठं विधान खडसे यांनी केलं आहे.

‘मी जे ऑडिओ क्लिपमध्ये बोललो आहे, मला सतत जामनेर मतदारसंघातून नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्‍यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे दररोज रुग्णांचे निधन होत आहे. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. गिरीश महाजन पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. १९९४, १९९५ मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांच्यासोबत काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. मुख्यमंत्रिपदाची  स्वप्ने पाहणे चुकीचे आहे का? गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी केली.

त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरलो. म्हणून आज गिरीशभाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही. मी कोणाचे पाय चाटत नाही. त्यामुळे गिरीशभाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही. आधी आपल्या मतदारसंघाच्या समस्या सोडवा, असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button