अपकार मी -अपराध मी, परी तू क्षमा !

Culprit

नाविन्या माझ्यासमोर बसली होती .खूप अस्वस्थ होती. सतत अधून-मधून रडत होती. तिच्यात सगळी नैराश्याची लक्षणे दिसत होती. कारण असं होतं की ती ड्रायव्हिंग करत होती आणि बरोबर आई-वडील भाऊ असे सगळे ट्रीपला जात होते ,आणि अचानक एक्सीडेंट झाला .नेमकं काय झालं तिलाही कळलं नाही. दुर्दैवाने त्या अपघातात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तिच्याही हाताला भयंकर दुखापत झाली होती. आई व भाऊ किरकोळ जखमी झाले होते .निराशे बरोबर तिच्या मनात खोल अपराधीपणाची भावना होती की मी ड्रायव्हिंग करत असल्यामुळे अपघात झाला आणि वडिलांच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. काही केल्या तिला ही बोच बाजूला टाकता येत नव्हती.

अशा अनेक घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात की ज्यामुळे व्यक्ती कायम त्यासाठी स्वतःला जबाबदार धरत असतात .त्याचे त्यांना अतीव दुःख होते. मंजिरीच्या आईला दोन चार दिवसांपासून ताप येत होता. दोन दिवस ती जरा ऑफिस कामात बिझी होती .शुक्रवारी सुट्टी टाकून तिला डॉक्टरांकडे नेऊन आणू म्हणून ठरवत होती. तोपर्यंत जुजबी तापाची औषधे दिली होती आणि ताप आटोक्यातही होता. पण आदल्या दिवशी अचानक आई तिला सोडून गेली .अगदी अचानक ! आपणच दवाखान्यात न्यायला उशीर केला या भावनेने उगीचच मंजिरी अजूनही स्वतःला दोष देते. खरं तर आईचे पोट बरेच दिवसापासून ठीक नव्हते .जुलाब होत होते. हे आईने तिला उगीच काळजी नको म्हणून सांगितले नव्हते.

असेच बरेचदा अनेक लोकांचे करिअर किंवा बिजनेस विषयीचे निर्णय चुकतात. त्याचेही दुःख व अपराधी भाव त्यांच्यात दिसतो. विद्यार्थ्यांमध्ये आपण आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही यामुळे आजकाल अपराधी भाव जाणवतो .बलात्काराला बळी पडलेल्या स्त्रिया, की ज्यात त्यांची कुठलीही चूक नसते. पण तरीही त्या एक प्रकारचे guilt मनात सतत आयुष्य भर मनात बाळगत असतात. मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्ती त्यांच्यात होणाऱ्या हार्मोनच्या असमतोलातून त्यांच्याकडून चुकीचे विचार, भावना निर्माण होतात आणि त्यातून त्यांचे अयोग्य वर्तन घडते.

ते त्यावेळी कशानेच कंट्रोल होणारे नसते. परंतु त्यातून बाहेर पडल्यावर किंवा बरे झाल्यानंतर किंवा पॅनिक अटॅक गेल्यानंतर हातून घडलेल्या घटनेचे भयंकर वाईट त्यांना वाटत राहते. कुणाचा आपल्याकडून झालेला अपमान ,कुणालातरी सहन करावे लागणारे हाल किंवा कष्ट याबाबत ती व्यक्ती स्वतःला जबाबदार धरुन त्रास करुन घेते. मद्यपाशा सारख्या मानसिक आजारात सुद्धा हे guilt मद्यपीला त्रास देते. अर्थात परत अल्कोहोलचा असर सुरू झाला कि ते लयाला जाते.

असे ज्यांना NLP (neuro linguistic programming) च्या भाषेमध्ये unresolved issues, म्हणतात. ते माणसाच्या मनामध्ये साठून राहतात, कधी कधी ते कुणाजवळ बोलता येत नाहीत. अशावेळी व्यक्ती मनातल्या मनात कुढत राहतात. अनेक वर्षे या गोष्टीचे ओझे मनात बाळगून अक्षरश: मरण यातना भोगत असतात. असेच एक काका मध्यंतरी भेटले. (खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं आहे म्हणत होते. पण बोलत मात्र नव्हते.) 39- 40 वर्षांपूर्वीची ही गोष्ट ते सांगत होते. त्यावेळी गिरणी कामगारांचा संप झाला,अनेक गिरण्या बंद पडल्या. आर्थिक पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला. अशावेळी आलेली हतबलता मान्य करून एक दिवस दोघा नवरा बायकोनी हताश होऊन आधी लहानग्या मुलाला उंच बिल्डिंग वरून खाली टाकायचे आणि मग स्वतः उड्या मारून जीव द्यायचा अस ठरवल.

त्यावेळी मुलगा खूप छोटा होता .त्यानी त्याला टाकायला उचलले ,पण त्याने त्यांची कॉलर पक्की पकडून ठेवली आणि म्हणाला,” बाबा ! धरून ठेवा ना मला .नाहीतर मी मरून जाईल ना!”त्यामुळे त्या दोघांचा निश्चय ढासळला. आणि तेव्हापासून आजतागायत आपण कसे आपल्या मुलाच्या जीवावर उठलो होतो या घटनेची खंत त्यांना जन्मभर छळत होती. अक्षरशः ढसढसा अश्रू ढाळून त्यांनी दुःख मोकळे केले. अशी अगणित ओझी माणूस आपल्या हृदयावर बाळगून असतो.

फ्रेंड्स ! पण अशा ओझ्यांमधून मुक्त व्हायला तर हवं ! त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अशी एखादी घटना घडते त्यावेळी आपण, काही प्रश्न स्वतःला विचारू या.

  • हे जाणीवपूर्वक केलं होतं का ?असा विचार केला तर लक्षात येतं की नाही. ते माझ्या कंट्रोल मध्ये होतं का ? किंवा ते करण्याचा माझा उद्देश होता का? त्यात माझा काय फायदा होता ? असा विचार केला तर हे मी जाणीवपूर्वक केलेलं नाही , आणि त्यावर माझा कंट्रोल नव्हता हे सहज लक्षात येईल.
  • मी माणूसच आहे आणि माझ्याकडूनही काही चुका होऊ शकतात. याचाही स्वीकार करावा लागतो. समजा काही कारणांनी हे आपण जाणीवपूर्वक केले आहे ,तर काय करता येईल? की त्यासाठी आपण नुकसान भरपाई ,काहीतरी चांगल्या कृतीतून करू शकू. किंवा हवी ती मदत करून करू शकू. चांगल्या वागणुकीतून करू शकू.
  • त्याचप्रमाणे Forgive यात क्षमा करायची आहे स्वतःला. आणि Forget जी कुठली घटना भूतकाळात घडली असेल त्याला विसरून जाणे. कारण त्याशिवाय आपण वर्तमान काळात राहू शकणार नाही.
  • People make the best choice available to them at that time. अशा ना अशी belief मनामध्ये पक्की करून ठेवा. आणि मग आठवून पहा त्या परिस्थितीला. ती ज्यावेळी मी विशिष्ट कृती केली, ज्याचा मला ना आज अपराधी भाव वाटतो, त्या परिस्थितीमध्ये माझ्या जवळ कुठला दुसरा मार्ग होता? (ती सिच्युएशनच त्याला जबाबदार होती)
  • दुसरी गोष्ट त्या वेळची माझी मॅच्युरिटी, समज, परिणामांचा मला असणारा अंदाज. हे सगळं वेगळं होतं. आणि अशावेळी मी जो निर्णय घेतला होता तो त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त योग्यच होता .आज जेव्हा मला हे लक्षात येत त्या वेळेला ते शहाणपण ,ती मॅच्युरिटी आहे म्हणून येतं. कारण एखादी सर्वसामान्य नॉर्मल व्यक्तीसुद्धा बरेचदा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी कमी पडते ती यामुळेच. त्याबद्दल कदाचित नंतर तिला वाईटही वाटत असेल.
  • बरेचदा तर आपल्याला वेळच नव्हता विचार करायला .अशीही परिस्थिती असते. ती एक होती उत्स्फर्त प्रतिक्रिया होती. आणि जेव्हा प्रतिसादाच्या ऐवजी प्रतिक्रिया जाते, त्यावेळी नंतर अपराधी भाव जाणवण्याची शक्यता भरपूर जास्त असते.

म्हणून परत एकदा कायमस्वरूपी लक्षात ठेवा की,”People make the best choice available to them at that time !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER