मी राम आहे की रावण ? हे नांदेडची जनताच सिद्ध करणार – अशोक चव्हाण

ASHOK

नांदेड: नांदेड महानगर पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्ष बहुमताने निवडून येईल आणि नांदेडचा महापौर काँग्रेस पक्षाचाच होणार आहे. आणि त्यादृष्टीने पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. असं म्हणत मी राम आहे की रावण हे नांदेडची जनताच ठरवतील असा खोचक टोला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खास. अशोक चव्हाण यांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना लगावला.

सध्या काँग्रेस पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची तयारी सुरु असून आम्ही भरपूर व्यस्त आहोत. त्यामुळे सध्या कोण काय म्हणतंय, कोण टीका करतंय याचा समाचार योग्य वेळी घेऊ. मी राम आहे की रावण, का आणि कोणी ? हे नांदेडची सुज्ञ जनताच ठरवेल. निलंगेकरांना तो बोलण्याचा अधिकार नाही. असेही चव्हाण म्हणाले.

खालच्या पातळीवर जाऊन ते प्रचाराला प्रारंभ करीत आहेत. पण त्यांच्या पावलावर आम्हाला जायचं नाही. प्रचाराचा दर्जा आणि लोकशाहीची जाण आम्ही राखू. परंतु आमच्यावर कोण टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे. असा कडक इशारा चव्हाणांनी यावेळी दिला.

नांदेडमध्ये सध्या महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशोक चव्हाणांच्या ताब्यात असलेली ही मनपा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी भाजपने काल लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मेळावा घेतला. तसंच शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर यांनाही आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे नांदेडच्या मनपा निवडणुकीत अशोक चव्हाण विरूद्ध सर्वपक्षीय विरोधक असा जोरदार राजकीय सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.