पवारांसह सर्व नेते पूरग्रस्तांसाठी काम करतायेत, याचा मला सार्थ अभिमान – सुप्रिया सुळे

sharad pawar supriya sule

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदतनिधीचा सुमारे ५० लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयीन वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी पक्षाकडून होत असलेल्या मदतीची माहिती दिली.

यावेळी त्या म्हणाल्या की, पुरग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. पूरग्रस्त भागातील जिल्ह्यात सध्या मदतीची नितांत आवश्यक्ता आहे. महापुराची परिस्थिती कशामुळे उद्भवली हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणे, त्यांना औषध उपलब्ध करून देणे, आणि त्यांची घरे तत्काळ कशी उभी करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. हा एक भावनिक विषय आहे, नुसते घर दिले, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपत नाही. तर, तिथे जावून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

शरद पवार मुख्यमंत्री असताना लातूरचा भूकंप झाला होता. त्यावेळी सलग १५ दिवस त्यांनी प्रशासनाला सोबत मदत कार्य करत होते. जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी तिथे जावून मांडी घालून बसलंच पाहिजे आणि लोकांना वेळ दिला पाहिजे, असेही खासदार सुळे यांनी सांगितले.

पवार साहेब आजही कराडला जात आहेत. आमचे सगळे नेते विशेषतः दादा, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते आपापल्या क्षेत्रात जावून अंग झटकून काम करत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही खासदार सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.