शिवसेनेसोबतची युती तुटली असे मी म्हणणार नाही- फडणवीस

Uddhav Thackarey-CM Fadnavis

मुंबई : शिवसेनेसोबतची युती तुटली असे कधीही म्हटलेले नाही, तसे म्हणणारही नाही, असे  काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. चर्चेची दारं भाजपने नाही तर शिवसेनेने बंद केली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यानंतर तुम्ही युती तोडता आहात का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर युती तुटली असे म्हणणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंनी माझे फोन घेतले नाही मात्र राष्ट्रवादी व इतरांशी ते बोलत होते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती.  त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : युती फाटली, किल्ली पवारांकडे?

उद्धव ठाकरे यांच्या आसपास असलेल्या लोकांनी दरी वाढवण्याचं काम केलं , असाही आरोप  देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजप आमदार फोडण्याचं काम करत आहे असाही आरोप केला जातो आहे. माझे त्यांना खुले आव्हान आहे की, तुम्ही पुरावे द्या, नाही तर माफी मागा. सरकार स्थापन करताना आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही हे आश्वासन देतो. येत्या काळात भाजपचेच सरकार येईल हा विश्वास मी व्यक्त करतो आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षांचेही मी आभार मानतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.