‘निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही’

Vinod Tawde

मुंबई :- विधानसभा निवडणुकीत मला तिकीट मिळाले नाही, तेव्हा मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) आदींचे फोन आले, त्यांनी माझी विचारपूस केली. पण भाजप सोड आणि आमच्याकडे ये, असे म्हणण्याची हिंमत कुणाची झाली नाही. भुंगा लाकूड कुरतडू शकतो, पण कमळात अडकला तर त्याच्या पाकळ्या तोडत नाही असे सांगत ज्या पक्षाने मला घडविले त्या पक्षात एखाद्या निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. असे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सत्कार समारंभात म्हटले.

भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विनोद तावडे (Vinod Tawde) यांचा बोरिवली येथील अटल उद्यान येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तावडेंनी आपले मनोगत व्यक्त केले.

तावडे म्हणाले, पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी रचनात्मक कार्य करायचे असते. आता मला पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी कार्य करत राहणे हेच माझे ध्येय आहे.

तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही विनोद तावडे यांचे कौतुक केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मुंबई भाजप अध्यक्ष, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, शालेय शिक्षणमंत्री अशा अनेक महत्वाच्या पदांवर विनोद तावडे यांनी काम केले आणि त्या पदांना न्याय दिला आहे. तावडे यांची पक्षावर निष्ठा आहे. त्यामुळे कठीण काळातही त्यांचा संयम ढळला नाही,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER