मी आईनिर्भर

Hardik Joshi

कोरोना संसर्गाने आपल्या शब्दकोशात अनेक नवनवीन शब्द दाखल झाले आहेत. एखादं संकट आपल्या आयुष्यामध्ये उभं राहतं आणि त्यावर मात करत असताना त्याच्याशी लढत असताना नव्या संकल्पना आपल्या जगण्याशी जोडल्या जातात. त्यातून वेगळा शब्दकोश निर्माण होतो याचा अनुभव गेल्या सात-आठ महिन्यामध्ये प्रत्येकाने घेतला आहे.. जसे लॉक डाऊन , सुरक्षित सामाजिक अंतर हे शब्द प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यातला महामेरू बनले. पॉझिटिव्ह या शब्दाची कधी नव्हे ती माणसाच्या मनात धास्ती निर्माण झाली. तसेच नागरिकांच्या शब्दकोशात असे नवे शब्द आले तसेच राजकारणाही नव्या शब्दांची भर पडली आणि त्यातलाच एक शब्द म्हणजे आत्मनिर्भर.

लॉकडाऊन काळामध्ये अनेक गोष्टी विस्कटून गेल्या. सरकारच्या हातातही एका टप्प्यावर काहीच उरलं नाही. तेव्हा स्वावलंबी या संकल्पनेलाच आत्मनिर्भर या नव्या शब्दाने लोकांसमोर मांडलं गेलं. आत्मनिर्भर या शब्दावरून सोशल मीडियामध्ये अनेक विनोदी पंच आले. अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) म्हणजेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा याने आत्मनिर्भर या शब्दाला थोडसं वळवून आई निर्भर असं म्हणत आई सोबतच्या अनेक आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. मी आत्मनिर्भर ही संकल्पना देशात राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला आली होती. याचदृष्टीने सगळ्याच ग्रुपमध्ये मी कुणावर निर्भर आहे यावर अनेक मेसेज व्हायरल झाले होते.

काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर्तुळामध्ये फिरत होते. सध्या अभिनेते ,कलाकार, सेलिब्रिटी यांनाही सोशल मीडिया हे माध्यम खूप खुणावत असते. त्यामुळेच समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींवर कलाकार नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तुफान लोकप्रिय झालेला हार्दिक जोशी यांने आई निर्भर असे लिहिलेला टी-शर्ट घातलेला फोटो त्याच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला.

कुठल्याही व्यक्तीला त्याच्या आईविषयी बोलायला नेहमीच आवडतं आणि म्हणूनच या फोटोसोबत व्यक्त होताना हार्दिक म्हणतो, आपल्यापैकी प्रत्येक जण लहानपणापासून आईवर अवलंबून असतो. ते अवलंबून असणे प्रत्येकाला खूप आवडत असते. इतकंच नव्हे तर आपण कितीही मोठे झालो तरी एखादी गोष्ट आपल्यासाठी आईनेच करावी असेही मनापासून वाटत असतं. मी देखील असाच आईवर अवलंबून असणाऱ्या मुलांपैकी एक आहे.

चित्रीकरणाच्या निमित्ताने मला घरापासून दूर राहावे लागत आहे मात्र रोज आईला फोन करणे, दिवसभरात काय काय झालं हे आईला सांगणे यामध्ये माझ्या दिनक्रमात अजूनही खंड पडलेला नाही. माझ्या अभिनयाच्या आवडीला जोपासण्यात ,त्याला प्रोत्साहन देण्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये आईचा खूप मोठा वाटा आहे. लॉकडाउन काळात मी माझ्या घरी मुंबईला गेलो त्यावेळेला इतक्या दिवसांची सुट्टी मी आईसोबत घालवली याचा मला खूप आनंद झाला. कारण एकदा का शूटिंग सुरू झालं की मला आईचा सहवास मिळणार नव्हता. त्यामुळे मी आईच्या हातच्या अनेक पदार्थांवर ताव मारला.

मला जे काही खावंसं वाटत होतं ते आईला हक्काने सांगितलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी आयुष्यभर आईवर अवलंबून राहावं. जेव्हा या लॉकडाऊन काळामध्ये वेगवेगळे शब्द नव्याने कानावर आले, संसर्ग काळामध्ये नव्या संकल्पना नव्या उपाययोजनांच्या माध्यमातून शब्द निर्माण झाले, त्यामधला आत्मनिर्भर हा शब्द मला खरंच खूप आवडला. मात्र जेव्हा स्वतः निर्भर होत असताना माझ्यातला हार्दिक आईवर किती अवलंबून आहे याचा देखील मला आनंद व्हायचा. म्हणूनच मी एका टी-शर्टवर आईनिर्भर असं पेंटिंग करून घेतलं आणि तो शर्ट घालून फोटो शेअर केला.

गेल्या तीन वर्षापासून टीव्हीवर सुरु असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिकने साकारलेला पैलवान रणविजय गायकवाड म्हणजेच राणा हा खूप लोकप्रिय झाला. हार्दिकला कोणत्याही कार्यक्रमात राणा अशीच हाक मारली जाते. मूळचा मुंबईचा असलेला हार्दिक सुरुवातीच्या काळात कॅमेऱ्याच्यामागे काम करून या क्षेत्रातील गोष्टी शिकत होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा या भूमिकेने त्याचे नशीबच बदलून गेलं. छोट्या पडद्यावर दिसणारा हा बलदंड शरीराचा कुस्तीवीर राणा प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्याच्या आईवर पूर्णपणे अवलंबून असलेले एक शहाणं बाळ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER