मी पोस्टाच्या कोऱ्या पाकिटासारखा- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil.jpg

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर पाटील म्हणाले, आपण पोस्टाच्या कोर्‍या पाकिटासारखे असून त्यावर जो पत्ता टाकाल त्यावर जाईन, अशा शब्दांत त्यांनी पक्षावरचे प्रेम व्यक्त केले आहे.

चंद्रकांत पाटील हे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. रा. स्व. संघाच्या माध्यमातून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते झाले. परिषदेचे राष्ट्रीय महामंत्रिपद त्यांनी भूषविले.

तेथून ते संघात परतले आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात संघाचे काम सुरू केले. नंतर त्यांना भाजपमध्ये पाठविण्यात आले. पुणे पदवीधर मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.

पाटील यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाते. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांसह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.

दरम्यान, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम अंगावर घ्या, म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक काम तुमच्या हातून होईल, असे माझे गुरू यशवंतराव केळकर यांनी सांगितले होते. मी त्यांच्या शिकवणुकीनुसार वाटचाल करीत असून भाजपच्या नितीन गडकरी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वच नेते त्याच गुरुमंत्रानुसार काम करतात, असे पाटील म्हणाले.