मी भारत सरकारची आभारी आहे : किरण बेदी

पुद्दुचेरी :- पुद्दुचेरीतील राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. किरण बेदी यांची नायब राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्यात आली. आता या पदाचा अतिरिक्त कारभार तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

किरण बेदी (Kiran Bedi) यांनी सोशल मीडियावर पत्राद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, “पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी भारत सरकारची ऋणी आहे. मी त्या सर्वांचे आभार मानते, ज्यांनी या काळात माझ्यासोबत काम केले. मी नायब राज्यपाल म्हणून जे काही केले ते त्यागाच्या भावनेने केले. नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी पार पाडली. मी पूर्ण विश्वासाने सांगू शकते की, या कार्यकाळात मी राजनिवास टीमसोबत पूर्ण निष्ठेने जनहितासाठी काम केले आहे. पुद्दुचेरीचे भविष्य उज्ज्वल आहे.”

नायब राज्यपालपदी कार्यरत असताना किरण बेदी यांचे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्याशी मतभेद निर्माण झाले होते. नायब राज्यपालांच्या निर्णयामुळे पुद्दुचेरीच्या संबंधित अनेक निर्णय रखडलेले आहेत. याचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर फोडायला सुरू केले होते. त्यामुळे पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांना लोकांची सहानुभूती मिळत आहे, अशी तक्रार भाजप नेत्यांनी केंद्राकडे केल्याची माहिती होती.

काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पुद्दुचेरीतील नारायणस्वामी सरकार अल्पमतात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. येत्या काही महिन्यांत पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER