पवारांनी केलेले ‘ते’ वक्तव्य अत्यंत दुःखदायी – देवेंद्र फडणवीस

sharad-pawar-devendra-fadnavis

मुंबई: ‘शरद पवार हे राजकारणातले जाणकार नेते आहेत. राज्यातील परिस्थितीची त्यांना संपूर्ण माहिती असते. मात्र केवळ राजकीय हेतूने ते जेव्हा विधान करतात, तेव्हा अत्यंत वाईट वाटतं. माझ्याबद्दल त्यांनी केलेलं ‘ते’ वक्तव्य खूपच निराशाजनक होतं,’ असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘देवेंद्र फडणवीस हे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सत्तेत परतण्यासाठी उतावीळ झालेले आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्याबद्दल फडणवीस यांना विचारलं असता म्हणाले की, ‘शरद पवारांसारख्या राजकीय जाणकार नेत्यानं असं बोलणं हे माझ्यासारख्याला निराश करणारं आहे. करोनाच्या संकटानंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी लढण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारची नाहक बदनामी होत आहे. ती थांबवता येत नसल्यामुळं माझ्यावर असे आरोप केले जात आहेत,’ असं फडणवीस म्हणाले.

आम्हाला सरकारमध्ये परतण्याची अजिबात घाई नाही. हे सरकार पाडण्याचीही बिलकूल गरज नाही. हे सरकार अंतर्विरोधानं पडणारच आहे. संकटाच्या काळात सरकार पाडण्याची वेळ नाही. ही करोनाविरुद्ध लढण्याची वेळ आहे. मात्र, शरद पवार जाणीवपूर्वक असे आरोप करत आहेत. मीडिया देखील त्या बातम्यांवरच दिवस घालवत आहेत. करोनाच्या रुग्णवाढीवर, रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीबद्दल कोणी बोलत नाही. शरद पवार हे हुशार नेते आहेत. करोनाच्या परिस्थितीकडं लक्ष जाऊ नये हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे, असं फडणवीस म्हणाले.

———————————————————————————————————————————————————

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER