‘सरकारवर शिंतोडे उडाले हे मी मान्य करतो’, संजय राऊत बॅकफूटवर

Sanjay Raut

मुंबई : सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत, हे मान्य करायला मि मागेपुढे पाहणारा व्यक्ती नाही. कालच्या घटनेनंतर आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेनेचे संकटमोचक संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी मनमोकळेपणाने चर्चा केली. पोलीस खाते हा राज्याचा मुख्य कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नेहमीच सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडल्या. या सगळ्यावर लगाम ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं. या सगळ्या प्रकरणात शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन, असे राऊत यांनी सांगितले.

परमबीर सिंह यांच्याविषयी संजय राऊत यांनी समतोलपणे भूमिका मांडली. परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा दिली आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी पत्रात लिहलेल्या गोष्टींची सत्यता पडताळावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही सत्यता पडताळून योग्य निर्णय घेतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

विरोधी पक्षाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जेव्हा अश्या गोष्टी घडतात तेव्हा विरोधकांकडून अश्या मागण्या होत असतात. मात्र विरोधकांच्या मागणीवर सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मान्य करायला हरकत नाही. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक बाब आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER