२६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकणार? एनडीआरएफ सज्ज

Hurricane - Maharashtra Today

नवी दिल्ली : नुकतेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. तौक्ते चक्रीवादळ शांत होत नाही तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, तर येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर आता केंद्र सरकारने देखील तयारी सुरू केली आहे. पूर्व किनारपट्टीवर ज्या ज्या राज्यांना ‘यास’ चक्रीवादळाचा धोका आहे, त्या राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, आरोग्यविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे देखील निर्देश मार्गदर्शक सूचनांमध्ये देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.

यास चक्रीवादळ २६ मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने एनडीआरएफ सज्ज झाली आहे. एनडीआरएफच्या काही तुकड्या तौक्ते चक्रीवादळाच्या बचावकार्य आणि पुनर्वसन कार्यासाठी पाठवल्या होत्या. त्या तुकड्या माघारी बोलावण्यात येत आहेत. तसेच काही तुकड्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाठवायला सुरुवात देखील करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ‘यास’ चक्रीवादळाच्या प्रवासासंदर्भात हवामान विभागाकडून जसजशी माहिती मिळेल त्यानुसार एनडीआरएफच्या इतर तुकड्या त्या त्या ठिकाणी मदतकार्यासाठी पाठवल्या जातील, असं एनडीआरएफने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button