कलंबर कारखान्याला गतवैभव मिळवून देवूत- श्यामसुंदर शिंदे

Shyamsundar Shinde

नांदेड/ प्रतिनिधी: कलंबर कारखाना हा लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकर्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून बंद पडलेला हा कारखाना पुन्हा सुरु करून गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार तालुक्यातील कौठा येथे सोमवारी झालेल्या जाहीरसभेत केले. दरम्यान या जाहीरसभेत गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी शिंदे यांना जाहीर पाठींबा दिला.

ही बातमी पण वाचा:- मनरेगाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसच्या उमेदवारासाठी ठरतो डोकेदुखी

कौठा येथे सोमवारी सायंकाळी शेकापची जाहीरसभा झाली. व्यासपीठावर स्वतंत्र भारत पक्षाचे नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर, खुशाल कापसे, पं.स.सदस्य संजय देशमुख, श्याम पाटील चिखलीकर, वैजनाथ देशमुख, रावसाहेब पाटील शिंदे, गोविंदराव वागोरे, बाबुराव देशमुख, सदाशिव पाटील बामणीकर, माधवराव तेलंग आदींची उपस्थिती होती.

यावेळी सभेला मार्गदर्शन करताना उमेदवार श्यामसुंदर शिंदे म्हणाले, कौठा येथे आरोग्य केंद्र उभारणे, येथे राष्ट्रीयकृत बँक आणणे व धरणाचे काम पूर्ण करणे यासाठी मी कटीबद्ध राहील. मी सुद्धा शेतक-याचा मुलगा आहे, शेतक-र्यांचे कष्ट, परिश्रम याची मला जाणीव आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी, यानुसार शेतक-र्यांच्या सर्व प्रश्नांची मला जाण आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कलंबर साखर कारखान्याबाबत आपली भुमीका स्पष्ट केली. बंद पडलेल्या कलंबर कारखान्याचा प्रश्न शेतक-र्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. हा कारखाना पुनरुज्जिवित करण्यासाठी आम्ही स्व. विलासराव देशमुख यांना आग्रह धरला होता. त्यांनी त्यासाठी तयारी सुद्धा दाखवली होती. परंतु काही लोकांनी राजकारण आणून शेतक-र्यांच्या ताटात वरण-भाताऐवजी माती कालवण्याचे काम केले, असा आरोपही शिंदे यांनी केला. मी निवडून आल्यावर हा कारखाना पुनरुज्जिवित होण्यासाठी जे काही करता येईल, ते प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी मानार धरणातील गाळ काढून हे धरण पुनरुज्जिवित करून सुमारे पन्नास गावे अवलंबून असलेल्या लिंबोटी धरणाचाही अधिक लाभ शेतक-र्यांना मिळवून देणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.