विनम्र द्रविड म्हणतात, कौतुक माझे नाही तर ‘त्या’ खेळाडूंचे करा!

Team India - Rahul Dravid

भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील यशात तरुण व नवोदित खेळाडूंच्या योगदानाची चर्चा आहे. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, हनुमा विहारी, शुभमन गील, शार्दुल ठाकूर, वाॕशिंग्टन सुंदर या मंडळींनी केलेली कामगिरीचा सर्वत्र बोलबाला आहे. यशाचे भरपूर दावेदार असतात त्याप्रमाणे या खेळाडूंच्याही यशाबद्दल श्रेय घेणारे दावे होत आहेत; पण त्यांच्या जडणघडणीत खरोखर ज्याचे श्रेय आहे ते राहुल द्रविड (Rahul Dravid) मात्र म्हणतात की, आपले काही श्रेय नाही. तारीफ करायची तर त्या खेळाडूंची करा; कारण खेळ त्यांनी चांगला केला आहे. पण साऱ्या क्रिकेट जगताला माहीत आहे की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून आणि युवा संघाचा मार्गदर्शक म्हणून राहुल द्रविड यांचे या खेळाडूंच्या बाबतीत जेवढे योगदान आहे तेवढे इतर कुणाचेच नाही.

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाचे मनोबल कायम राखणारे आणि त्यांना प्रेरित करणारे संघ प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी याबाबत एक किस्सा सांगितला. त्यानुसार २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यात जेव्हा हनुमा विहारी किंवा पृथ्वी शाॕ यापैकी कुणाची निवड करायची, असा प्रश्न होता तेव्हा रवी शास्त्रींना माहीत होते की, याचा योग्य निर्णय देणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे राहुल द्रविड. त्यावेळी द्रविड हे भारत अ व १९ वर्षाआतील संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी या दोन्ही खेळाडूंचा खेळ अगदी जवळून पाहिला होता आणि त्यांच्या स्वभावाचीही त्यांना माहिती होती. त्यामुळे द्रविड यांच्या सल्ल्यानेच त्यावेळी चौथ्या कसोटीत हनुमा विहारीला खेळवले गेले होते. योगायोगाने दोन वर्षांनंतर याच हनुमा विहारीने दुखापतग्रस्त असतानाही अतिशय झुंझार खेळ करत भारतासाठी सिडनीचा कसोटी सामना वाचवला.

भारतीय संघाला एकाच वेळी दोन दोन दर्जेदार संघ तयार असतील एवढे प्रतिभावान खेळाडू एकाच दिवसात मिळालेले नाहीत. तर राज्य संघटना, राष्ट्रीय आणि ज्युनिअर निवड समित्या, ‘अ’ आणि युवा संघांचे प्रशिक्षक, राष्ट्रीय संघाचे सल्लागार, स्थानिक क्रिकेट आणि आयपीएल या सर्वांनी मिळून हे नवीन भारतीय क्रिकेट बनले आहे आणि भारतीय क्रिकेटच्या या सिस्टीमचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यात झहीर अब्बास यांच्यासारखा नावाजलेला पाकिस्तानी क्रिकेटपटूसुद्धा आहे.

यशाचे दावेदार अनेक असतात, या मुद्द्यावर भारत अ व युवा संघाचे प्रशिक्षक राहिलेले डब्ल्यू. व्ही. रामन गमतीने म्हणतात की, आतापर्यंत किती तरी जणांनी सांगितले असेल की, शुभमन गीलकडील प्रतिभा पहिल्यांदा त्यांनी ओळखली. मात्र यात काही तथ्यसुद्धा आहे हे रामन मान्य करतात; कारण भारतासारख्या खंडप्राय देशातून अशी प्रतिभा हुडकून काढणे हे एकट्यादुकट्याचे काम नाहीच. याबाबतचे उदाहरण माजी निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनी दिले आहे. ते म्हणतात की, २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीआधी सरावावेळी जो सर्वांत वेगाने चेंडू फेकणारा व फलंदाजांची परीक्षा घेणारा कर्मचारी होता रघू, त्याच्या चेंडूला शुभमनने उत्तुंग षटकार लगावला. एवढा उत्तुंग की चेंडू थेट गहुंजे स्टेडियमच्या स्टँडमध्ये जाऊन पडला. परांजपे म्हणतात की, तोपर्यंत केवळ विराट कोहलीच असा फटका खेळू शकतो ,असे मला वाटत होते; पण शुभमनचा तो फटका पाहून माझे मत बदललेले होते.

शार्दूल ठाकूर सांगतो की ‘अ’ किंवा युवा संघात खेळताना आम्ही त्यांच्या स्पर्धेत खेळत असतो जे राष्ट्रीय संघातील स्थानाचे दावेदार आहेत किंवा ज्यांनी आधीच नाव कमावलेले आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन यांच्यासारख्यांच्या सोबतीत आम्ही वावरत असतो तेव्हा खूप शिकायला मिळते.

हनुमा विहारी म्हणतो की, अ संघाचे दौरे फार महत्त्वाचे असतात. बऱ्याच अ संघांच्या दौऱ्यावर राहुल सर कोच असायचे. ते फारसे बोलत नाहीत आणि तंत्र बदलाबाबतही फार काही सांगत नाहीत; पण त्यांनी संघात शिस्त आणली आणि मानसिक तयारीवर ते जोर देतात. त्यामुळे या ‘अ’ संघांच्या दौऱ्याचा मला खूपच फायदा झाला आहे.

ठाकूर म्हणतो, राहुल सरांनी आम्हाला मोकळीक दिली होती. ते सांगतात की, तुमच्या योजनेनुसारच खेळा; पण ठरलेल्या योजनेपासून भरकटू नका. प्रत्येक सामन्यानंतर ते आमच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचे आणि आम्हालासुद्धा मूल्यमापन करायला सांगायचे.

रामन म्हणतात की, दौऱ्यावर प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल याची राहुल द्रविड काळजी घेतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला संधी मिळेल आणि सुधारणा करता येईल याची खात्री असते. या प्रकारे आताचे हे प्रतिभावान भारतीय खेळाडू बऱ्याच जणांच्या नजरेखालून गेल्यावर समोर आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER