राबडी देवीच्या जीवनावरील वेबसीरीजमध्ये हुमा कुरेशी बनणार राबडी देवी

वास्तव जीवनातील लोकप्रिय आणि विवादास्पद लोकांवर वेबसीरीज, मालिका, सिनेमे बनवण्याचे काम गेल्या काही काळापासून जोरदारपणे सुरु आहे. कंगना रनौतने (Kangana Ranaut) तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि यशस्वी अभिनेत्री स्वर्गीय जयललिता यांच्या जीवनावरील सिनेमात जयललिता यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा आता पूर्ण झाला असून लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या जीवनावरही ‘मॅडम चीफ मिनिस्‍टर’ सिनेमा तयार झाला असून तो लवकरच रिलीज केला जाणार आहे. आता निर्माता सुभाष कपूर बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवीच्या (Rabdi Devi) जीवनावर आधारित वेब सीरीज ‘महाराणी’ घेऊन येणार आहेत.

मॅडम चीफ मिनिस्टरमध्ये रिचा चड्ढाने माजी मुख्यमंत्री मायावती यांची भूमिका साकारली आहे. एका दलित समाजातील महिला राजकारणात का येते आणि त्यात यश मिळवून अनेक दिग्गजांना धूळ चारत मुख्यमंत्री कशी बनते ते या सिनेमात दाखवण्यात आलेले आहे. हा सिनेमा खरे तर गेल्या वर्षी 17 जुलैला रिलीज केला जाणार होता. पण कोरोनामुळे सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. आता 22 जानेवारी रोजी हा सिनेमा संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन सुभाष कपूरने केले आहे.

या चित्रपटानंतर निर्माते सुभाष कपूर आता राबडी देवीच्या जीवनावर वेबसीरीज घेऊन येत आहे. या वेबसीरीजचे नाव ‘महाराणी’ असे ठेवण्यात आले असून हुमा कुरेशी (Huma Qureshi) यात राबडी देवीची भूमिका करीत आहे. सुभाष कपूरने या वेबसीरीजबाबत बोलताना सांगितले, ही वेबसीरीज राबडी देवीची जीवनागाथा नाही तर त्यांच्यापासून प्रेरित अशी ही सीरीज आहे. पब्लिक डोमेनमध्ये त्यांच्याबाबत ज्या ज्या घटना आहेत त्या एकत्र करून त्यांना आम्ही एका कथेत बांधले असून त्यातून त्यांचे जीवन उलगडण्याचे काम केले आहे. वास्तवातील घटना असल्या तरी सिनमॅटिक लिबर्टी घेऊन आम्ही त्यांना फिक्‍शनचा रंग दिलेला आहे. सत्ता फक्त उच्चभ्रू किंवा उच्चशिक्षितच चालवू शकतात असे नाही तर कमी शिकलेल्या व्यक्तीही सत्ता चांगल्या प्रकारे राबवू शकतात हेच आम्ही या वेबसीरीजमधून दाखवणार आहोत. या वेबसीरीजचे संपूर्ण शूटिंग मध्यप्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER