‘ह्या टेनिसपटू’ ला ग्रँड स्लॕमची क्वार्टरफायनल गाठण्यासाठी लागली 20 वर्षे

चीनची ली ना (Li Na) , जपानचे नाओमी ओसाका (Naomi Osaka) व केई निशीकोरीनंतर (Kei Nishikori) व्यावसायिक टेनिसमध्ये आता आणखी एक आशियाई खेळाडू चमकत आहे. तिने आॕस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे आणि जिद्द आणि चिकाटी राखली तर एकना एक दिवस यश मिळतेच हे दाखवून दिले आहे.

ही खेळाडू म्हणजे तैवानची सिये सू वेई (Hsieh Su-Wei). आणि तिची कामगिरी विशेष यासाठी की वयाच्या 35 व्या वर्षी तिने पहिल्यांदाच ग्रँड स्लॕम स्पर्धेची क्वार्टर फायनल गाठली आहे. व्यावसायिक टेनिसमध्ये खुले युग सुरू झाल्यापासून दुसऱ्या कोणत्याही महिला खेळाडूने एवढ्या वयात पहिल्यांदा ग्रँड स्लॕमची क्वार्टर फायनल गाठली नव्हती. आणि तिच्या जिद्द आणि चिकाटीचा विषय यासाठी की, ग्रँड स्लॕम स्पर्धातील 38 व्या प्रयत्नात आणि तब्बल 20 वर्षात ती अंतीम आठात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.

2001 मध्ये तिने व्यावसायीक टेनिसमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तिने वर्षात 37 सामने जिंकून धमाकेदार सुरुवात केली होती. पण ग्रँड स्लॕम स्पर्धेचा मेन ड्रॉ खेळण्यासाठी तिला 2005 उजाडले आणि 2017 मध्ये तिने टाॕप टेन खेळाडूवर पहिला विजय मिळवला.

तीन वेळा ग्रँड स्लॕमची चौथी फेरी गाठूनही (2008 व 2018 आॕस्ट्रेलियन ओपन आणि 2018 विम्बल्डन) ती उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठू शकलेली नव्हती पण आता 35 वर्षे वयात तिने आॕस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) हा टप्पा गाठलाय. यासाठी फ्रेंच ओपनची माजी उपविजेती मार्केटा व्होंद्रुसोव्हा हिला तिने 6-4, 6-2 पराभूत केले. त्याआधी दुसऱ्या फेरीत तिने माजी युएस ओपन विजेती बियांका आंद्रेस्कू हिला पराभूत केले होते.

योगायोगाने तिचा पुढचा सामना आता आशियातील टेनिस सुपरस्टार नाओमी ओसाकाशी होणार आहे आणि ओसाकासारख्या टाॕप टेन खेळाडूला सिये सू वेईने नेहमीच सतावले आहे. ओसाकाविरुध्द तिची कामगिरी 1 विजय आणि 5 पराभव अशी आहे. जेंव्हा ओसाका नंबर वन होती तेंव्हा 2019 मध्ये मियामी येथील स्पर्धेत तिने ओसाकाला पराभूत केले होते. 2018 मध्ये तिने सिमोना हालेप व गर्बाईन मुगुरुझा यांना मात दिलेली आहे. 2019 च्या आॕस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीतही तिने ओसाकाला सतावले होते. त्याच वर्षी विम्बल्डनमध्ये कॕरोलिना प्लिस्कोव्हाने तिच्यावर निसटता विजय मिळवला होता.

तिच्याशी खेळायचे कसे तेच समजत नाही, कारण प्रत्येकाशी खेळताना तिचा खेळ वेगळा असतो. ती चेंडू कुठे टाकणार याचा अंदाजच येत नाही. स्वतः सिये सू म्हणते की, शेवटच्या सेकंदापर्यंत तिलासुध्दा माहित नसते की ती चेंडू कुठे टाकणार आहे.

ओसाकाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना शेवटच्या सेटमध्ये 3-5 अशा पिछाडीवरुन दोन मॕचपाॕईंट वाचवत शेवटच्या 12 पैकी 10 गेम जिंकून गर्बाईन मुगुरूझा हिला 4-6, 6-4, 7-5 अशी मात दिली.

सिये सू वेईचे यश उल्लेखनीय यासाठी की, ती ज्या तैवान देशातून आली तिकडे टेनिसच्या उच्च दर्जाच्या सुविधाच नाहीत. याबद्दल सू वेई सांगते की, मी तैवानमधील अतिशय छोट्या शहरातून आली आहे. तिथे सराव, प्रशिक्षण व फिटनेस कोच अशी काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे मी जपानमध्ये तीन वर्ष होती आणि तेथूनच माझे टेनिस जिवंत राहिले आहे. चिनी संस्कृतीत हे सोपे नाही. 10 ते 16 वर्ष काळात मी घराच्या जबाबदाऱ्यांतच गुंतले होते. त्यामुळे माझी सुरुवात उशीरा झाली होती. आॕस्ट्रेलियाशी सू वेईचे जवळचे संबंध आहेत. आॕस्ट्रेलियन ओपनचे माजी डायरेक्टर पॉल मॕक्नामी यांच्यासोबत ती 10 !वर्षांपासून व्यावसायिक टेनिससाठी जुळलेली आहे. तिचे कोच, फिटनेस कोच, मसाजर, हिटींग पार्टनर हे सर्व आॕस्ट्रेलियन आहेत. एवढेच नाही तर आपले सुटीचे दिवसही ती आॕस्ट्रेलियातच घालवते.

एकेरीत सिये सु वेई 71 व्या क्रमांकावर आहे पण दुहेरीत मात्र ती वर्ल्ड नंबर वन आहे. दुहेरीत बार्बोरा स्ट्रायकोव्हासोबत ग्रँड स्लॕम विजेतेपदं तिच्या नावावर आहेत. गंमतीची बाब म्हणजे 21 वर्षांपूर्वी ती आॕस्ट्रेलियन ओपनच्या ज्युनियर स्पर्धेत खेळली होती आणि त्यावेळी ज्या पाच खेळाडूंचा तिने सामना केला होता त्यापैकी कुणीच आता खेळत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER