टाइमपासच्या हॅट्रिकमध्ये ऋताची एन्ट्री

एखाद्या सिनेमाची कथा प्रेक्षकांना आवडली की त्याचा सिक्वेल तो बनता हे बॉस हे समीकरण म्हणजे आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ झाली आहे. बॉलीवूडमधला हा फंडा मराठीमध्ये देखील हिट झाला आहे. मला वेड लागले प्रेमाचे असं म्हणत टीनएजर वयातलं प्रेम बॉक्स ऑफिसवर (box office) हिट करणाऱ्या टाइमपास (Timepass) या मराठी सिनेमाने तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या असलेल्यांच्या प्रेमाला वेगळाच बहर आला होता. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग टाईमपास 2 नावाने पडद्यावर आला आणि तोदेखील तुफान हिट झाला. आता याच सिनेमाचा तिसरा भाग टाइमपास थ्री या नावाने येणार आहे आणि यामध्ये पल्लवीच्या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे ती अभिनेत्री हृता दुर्गुळेची. पल्लवीसाठी उत्सुक अशी कॅप्शन असलेला फोटो शेअर करत ऋतानेच टाइमपास थ्री मध्ये नायिकेच्या रूपात कोण दिसणार या प्रश्नाचा फुगा फोडला आहे. केतकी माटेगावकर आणि प्रिया बापटने सुरू केलेलं हे प्रेमाचे जग फुलवण्यासाठी आता ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) ही अभिनेत्री सज्ज झाली आहे.

दगडू आणि पल्लवीची प्रेम कथा खरेतर अनेकदा सिनेमाच्या पडद्यावर वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये दिसली होती. पण टाईमपासमधील दगडू आणि पल्लवी ही दोन वेगवेगळ्या जगातलं प्रेमीयुगुल एकत्र आलं आणि त्यांनी प्रेमाचा एक नवीनच अर्थ सांगितला.आई बाबा आणि साई बाबाची शपथ इथपासून ते तू काय पण बोल आपल्याला आवडतं इथपर्यंतचे अनेक डायलॉग हिट झाले.कॉलेजच्या मोरपंखी जीवनात प्रवेश केलेल्या मुला-मुलींसाठी तर हा सिनेमा एव्हरग्रीन ठरला होता . या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी या सिनेमाचा दुसरा भाग पडद्यावर आणला आणि टाईमपास २ या नावाने पल्लवी आणि दगडू यांच्या आयुष्याचा पुढचा पट दाखवण्यात आला. दुसऱ्या भागात अभिनेत्री प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या जोडीलाही प्रेक्षकांनी हिट केलं. गेल्या काही दिवसांपासून टाइमपास थ्री या सिनेमा घोषणा झाल्याचं सोशल मीडियावर झळकत होतं. जितकी उत्सुकता टाईमपास थ्री हा सिनेमा पडद्यावर कधी येतोय याची होती तितकीच उत्सुकता केतकी आणि प्रिया नंतर आता पल्लवीच्या भूमिकेत पडद्यावर कोण दिसणार याची होती. मध्यंतरी रवी जाधव यांनी ऋता दुर्गुळे आणि आर्या आंबेकरसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लवकरच टाइमपास थ्री येतोय आणि मला मिळाली नवी पल्लवी अशी कॅप्शन देत शेअर केला होता. ती सध्या काय करते या सिनेमात आर्या आंबेकरने तिच्या अभिनयाची जादू दाखवल्यामुळे पल्लवीच्या भूमिकेत आर्या असेल का अशी पुडी सोडली होती. पण तरीही हा प्रश्न मात्र नंतरही अनुत्तरितच राहिला होता. पण आता ऋतानेच तिच्या सोशल मीडिया पेजवर पल्लवीसाठी उत्सुक अशी कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहिल्यानंतर टाइमपास थ्री मध्ये ऋता दुर्गुळे पल्लवी साकारणार असल्याचं उघड झालं आहे.

विशेष म्हणजे ऋताने या पूर्वीचे टाइमपास सिनेमाचे दोन्ही भाग पाहून पल्लवी नेमकी कशी आहे याचा अभ्यास केला आहे. कॉलेजमध्ये असताना वडिलांना घाबरणारी पल्लवी, मराठी प्रमाणभाषेत बोलण्याचा आग्रह धरणारी पल्लवी, दगडूच्या सहवासात आल्यानंतर बिनधास्तपणे जगायला शिकणारी पल्लवी ,कॉलेज आयुष्य संपल्यानंतर जबाबदार झालेली पल्लवी या सगळ्या पल्लवी या व्यक्तिरेखेच्या छोटा ऋताने आत्मसात केल्या आहेत आणि आता ती टाइमपास थ्री या सिनेमातील पल्लवी कशी असेल हे दाखवण्यासाठी तयार झाली आहे. टाइमपास सिनेमाचे पहिले दोन्ही भाग पाहिलेल्यांसाठी नक्कीच नवी पल्लवी साकारणं हे आव्हान असल्याचे ऋता सांगते. विशेष म्हणजे या सिनेमाच्या पहिल्या दोन भागांमधून पल्लवीच्या आयुष्यातील दोन टप्पे प्रेक्षकांनी पाहिले आहेत. त्यानंतर नव्या टप्प्यातील पल्लवी पडद्यावर कशी असेल याची मलाही उत्सुकता आहे असं ऋता सांगते.

या मालिकेतून ऋता दुर्गुळे घराघरात पोहोचली. ही मालिका तिने जेव्हा केली तेव्हा ती कॉलेजमध्ये शिकत होती. त्यानंतर फुलपाखरू या मालिकेतील साकारलेली वैदेहीची भूमिकादेखील खूप लोकप्रिय झाली. अजूनही ऋताला वैदही या नावाने ओळखले जाते.अभिनयासोबत ऋताने सिंगिंग स्टार या शोचेनिवेदन देखील झकास केलं. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातही काम करत असून रंगभूमीवरदेखील तिने हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले आहे. स्ट्रॉबेरी शेक या वेबसीरीज मधून ऋताने बाप लेकीचं नातं कसं असतं हे दाखवून दिलं. गेल्या सात-आठ वर्षात ऋताने तिच्या अभिनयातील अनेक वेगवेगळ्या छटा दाखवल्या आहेत. मराठी पडद्यावर तुफान गाजलेल्या टाइमपास सिनेमाच्या तिसऱ्या भागात ऋताला पल्लवीची भूमिका करायला मिळणार असल्यामुळे ती प्रचंड खुश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER