ऋतिकच्या ‘फायटर’चे लेखक स्वर्गीय कर्नल नरिंदर ‘बुल’ कुमार यांच्या जीवनावर तयार करणार सिनेमा

RAMON CHIBB - Bull Kumar

सियाचीन भारताकडे राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले व या हिमक्षेत्राचे सामरिक महत्त्व आपल्या आरोहण मोहिमेद्वारे अधोरेखित करणारे नामवंत धाडसी गिर्यारोहक आणि लष्करी योद्धे निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार (Narendra Kumar) उर्फ ‘बुल कुमार’ (Bull Kumar) यांचे नुकतेच निधन झाले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. सियाचीन ग्लेशियर पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करून तेथे भारतीय ध्वज कायम राखण्यासाठी ऑपरेशन मेघदूत सुरु करण्यात आले होते. या मोहिमेत कर्नल नरेंद्र यांची सर्वेक्षण मोहीम व त्यात त्यांनी केलेले नकाशे व अभ्यास यांचे योगदान अनन्यसाधारण ठरले होते.

त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळेच त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तीचक्र आणि लष्करातील परमविशिष्ट सेवापदक व अतिविशिष्ट सेवापदकांनीही त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९६५ मध्ये भारताच्या पहिल्या यशस्वी एव्हरेस्ट आरोहण मोहिमेत कर्नल कुमार यांनी उपनेतेपदाची धुरा वाहिली होती. कर्नल कुमार व त्यांच्या चमूने पीर पंजाल रांगा, हिमालय, झांस्कर, लडाख, सालटोरो, काराकोरम, अगिल अशा सात पर्वतरांगा पार करून सियाचेनवर पाऊल रोवले होते. भारतीय हिमालयातील १३ सर्वोच्च शिखरांपैकी नऊ शिखरांवरील यशस्वी मोहिमा कर्नल कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडल्या. त्यात माऊंट नंदादेवीसारख्या तांत्रिकदृष्ट्या कठीण शिखराचाही समावेश आहे. अशा या भारताच्या वीराच्या जीवनावर आता सिनेमा बनवण्याचे घाटत आहे. ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘फायटर’ (Fighter) सिनेमा लिहिणारे लेखक रमण छिब (Ramon Chibb) आणि अंकु पांडे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाचे लेखन बलविंदर सिंह जंजुआ यांनी केले आहे.

रमण छिब स्वतः निवृत्त लष्करी अधिकारी असून त्यांनीही त्याच रेजिमेंटमध्ये काम केले आहे ज्या रेजिमेंटमध्ये कर्नल नरेंद्र कुमार होते. कर्नल नरेंद्र कुमार यांच्यासोबत त्यांनी खूप वेळ व्यतीत केलेला आहे. छिब यांनी या सिनेमाबाबत बोलताना सांगितले, कर्नल बुल यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सिनेमा बनवण्याची आम्हाला परवानगी दिल्याबद्दल आम्ही नरेंद्र कुमार यांच्या कुटुंबियांचे खूप खूप आभारी आहोत. आम्ही हा सिनेमा अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने तयार करणार आहोत. काही कंपन्यांनी आमच्यासोबत या सिनेमासाठी एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे. लवकरात लवकर कलाकारांची निवड करून प्रेक्षकांसमोर आम्ही नरेंद्र कुमार यांची शौर्यगाथा आणणार आहोत असेही छिब यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER