ऋतिक रोशनचा सुपर थर्टी आता इंग्रजीतही

super-30

गरीब परंतु हुशार मुलांचा चांगला अभ्यास करून त्यांना इंजीनियर बनवण्यासाठी आनंद कुमार नावाच्या एका शिक्षकाने मोफत शिकवणी सुरु केली. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या जेईई परीक्षेसाठी ते प्रत्येक वर्षी 30 मुले निवडत असत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या क्लासमधील सर्वच्या सर्व म्हणजे 30 मुले आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी होत असत. बिहारमधील या गुणवान शिक्षकाच्या जीवनावर बॉलिवुडमध्ये सुपर थर्टी नावाने चित्रपट तयार करण्यात आला होता. ऋतिक रोशनने (Hrithik Roshan) आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तिकीट खिडकीवरही प्रचंड यशस्वी झाला होता. आता हा चित्रपट इंग्रजीत निर्माण केला जाणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून ऋतिक रोशन पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतः आनंद कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सुपर थर्टी चेंजिंग द वर्ल्ड स्टुडंट टाइम- आनंद कुमार नावाने एक पुस्तक कॅनडातील लेखक आणि सायकॅट्रिक बीजू मेट्रो यांनी लिहिले आहे. या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या पुस्तकावर चित्रपट बनवण्याचे अधिकार आनंद कुमार यांनी घेतले आहेत. स्वतः ऋतिक रोशनही पुन्हा एकदा आनंद कुमार यांची भूमिका पडद्यावर साकारण्यास खूपच इच्छुक आहे. हा चित्रपट कधी सुरु केला जाणार आहे याचा निर्णय अजून झालेला नाही. ऋतिक रोशन सध्या तीन चित्रपटांमध्ये बिझी असल्याने तो यासाठी कसा वेळ काढतो त्यावर चित्रपटाच्या निर्मितीची योजना तयार केली जाणार आहे.

खरे तर यापूर्वी अनेकदा ऋतिकला आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती परंतु काही ना काही कारणाने ऋतिक रोशन काम करू शकला नव्हता. 20 वर्षांपूर्वी तरसेम सिंह यांनी शेक्सपियरच्या विख्यात हॅम्लेटची भारतीय आवृत्ती तयार करण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाचे नाव ‘आदित्य’ ठेवण्यात आले होते आणि ऋतिक रोशनला मुख्य भूमिकेसाठी घेण्याचे ठरत होते. परंतु काही कारणांनी ऋतिकने हा चित्रपट साईन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर 2014 मध्ये ऋतिक रोशनने हॉलिवुडमधील सुपरहिट चित्रपट ‘फास्ट अँड फ्यूरियस’चा दिग्दर्शक रॉब कोहेनची भेट घेतली होती. रॉब कोहेन ऋतिकला घेऊन एक हॉलिवुडपट बनवू इच्छित होता परंतु तो प्रकल्पही पुढे सरकला नाही. मात्र आता ऋतिक आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्तुळात प्रवेश करण्यास सिद्ध झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER