क्रिश 4 मध्ये चार भूमिका साकारणार ऋतिक रोशन!

hrithik-roshan-rakesh-roshan

केवळ बॉलिवुडच (Bollywood)नव्हे तर प्रेक्षकांनाही ऋतिक रोशनच्या क्रिश 4 ची उत्सुकता लागलेली आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासून निर्माता दिग्दर्शक राकेश रोशन आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) क्रिश 4 (Krish 4) बाबत काही ना काही बातम्या देत आलेले आहेत. परंतु आता वर्ष संपायला आले तरी या सिनेमाचे शूटिंग तर सोडा अजून अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे घोषणेला वेळ लागला असल्याचे म्हटले जात आहे. जरी सिनेमाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी सिनेमाच्या कथेसंबंधात अनेक बातम्या बाहेर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता आलेली ताजी बातमी म्हणजे क्रिश 4 मध्ये ऋतिक रोशन चार भूमिका साकारणार असून त्यापैकी एक भूमिका खलनायकाची असणार असल्याचे सांगितले जात आहे.

राकेश रोशनने 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2003 मध्ये ‘कोई मिल गया’मधून हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरहीरो रुपेरी पडद्यावर आणला होता. त्यानंतर त्याने आणखी दोन भाग बनवले. क्रिश सिनेमाची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याने क्रिश 4 कधी येतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. 2013 मध्ये आलेल्या क्रिश 3 नंतर राकेश रोशन आणि ऋतिक रोशन क्रिश 4 च्या कथेच्या शोधाला लागले. परंतु गेल्या वर्षीपर्यंत त्यांना म्हणावी तशी कथा सापडली नव्हती. क्रिशशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश रोशनने कथा निवडून पटकथेवर काम सुरु केले आहे. परदेशात शूटिंग करण्यासाठी लोकेशनही निवडले आहेत. परंतु पटकथा अजून म्हणावी तशी आकाराला आली नसल्याने सिनेमाची घोषणा केली गेली नाही. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये क्रिश 4 ची घोषणा केली जाऊ शकते. क्रिश सीरीजमधील हा सगळ्यात महागडा चित्रपट असणार आहे. तसेच सिनेमाच्या नावातही क्रिश 4 सोबतच आणखी एक टॅग लाईन जोडण्याचा विचार सुरु असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

सूत्रांनी पुढे सांगितले की, क्रिश 4 मध्ये ऋतिक रोशन चार भूमिका करताना दिसणार आहे. तसेच एक सुपर पॉवर असलेल्या एका महिलेचाही कथेत समावेश केला जाणार आहे. ऋतिक ज्या चार भूमिका करणार आहे त्या सर्वच्या सर्व वेगळ्या असणार असून त्यापैकी एक भूमिका खलनायकाचीही असू शकते. तसेच कोई मिल गयामध्ये पुन्हा अंतराळात गेलेला जादूही या चौथ्या भागात दर्शन देणार आहे. चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्ससाठी पुन्हा एकदा हॉलिवुडमधून तंत्रज्ञ मागवले जाणार आहेत.

चित्रपटाबाबत अनेक बातम्या येत असल्या तरी राकेश रोशन आणि ऋतिक रोशनने मात्र याबाबत काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतिकला याबाबत विचारले असता त्याने सांगितले, सध्या पटकथेवर काम सुरु आहे. पटकथा पूर्ण झाल्यावरच याबाबत आम्ही माहिती देऊ.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER