ऋतिक आणि दीपिका ‘फायटर’मधून प्रथमच येणार एकत्र

Hritik Roshan - Deepika Padukone - Fighter

ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आता प्रथमच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ऋतिकने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नव्या सिनेमाचा टीजर सोशल मीडियावर रिलीज केला असून काही तासातच ऋतिकच्या लाखों फॅन्सनी हा टीजर पाहिला आहे. यावरून ऋतिकच्या या सिनेमाची पहिल्या दिवसापासूनच बॉलिवुडमध्ये (Bollywood) चर्चा सुरु झाली आहे. ऋतिक आणि दीपिका पदुकोण यांनी आजवर कधीही एकत्र काम केले नव्हते. या दोघांना घेऊन काही निर्मात्यांनी सिनेमा सुरु करण्याची योजना आखली होती पण ते प्रोजेक्ट आकाराला आले नव्हते. मात्र सिद्धार्थ आऩंदने या दोघांना एकत्र आणले आहे. ऋतिक आणि दीपिकाच्या या सिनेमाचे नाव आहे फायटर (Fighter).

सिद्धार्थ आनंद हा भव्य दिव्य अॅक्शन सिनेमे देणारा दिग्दर्शक म्हणून बॉलिवुडमध्ये ओळखला जातो. ऋतिक रोशनसोबत त्याचे चांगलेच जमते. ऋतिकसोबत त्याने बँग बँग आणि 2019 मध्ये रिलीज झालेल्या वॉरचे दिग्दर्शन केले होते. वॉरने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा जास्तीचा बिझनेस केला होता. त्यानंतर सिद्धार्थ आणि ऋतिक पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरु होती. सिद्धार्थ आनंद ऋतिकसाठी एका चांगल्या कथेच्या शोधात होता. त्याला कथा मिळाली. त्यानंतर ऋतिक आणि सिद्धार्थच्या कथेबाबत अनेक बैठका झाल्या. ऋतिकने काही बदल सुचवल्यानंतर कथा फायनल करण्यात आली आणि ऋतिकच्या वाढदिवशी सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला. विशेष म्हणजे सिद्धार्थ आनंद या सिनेमाच्या निमित्ताने निर्माता म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ऋतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टीजर रिलीज करताना दीपिका आणि तो प्रथमच एकत्र येत असल्याचे म्हटले आहे. दीपिकानेही सपने खरे होतात अशी प्रतिक्रिया टीजर शेअर करताना दिली आहे. दीपिकाच्या पतिने अभिनेता रणवीर सिंहनेही या टीजरचे स्वागत करीत ‘लाइट’ लिहून आगीच्या अनेक इमोजी टाकलेल्या आहेत. ऋतिकचे निर्माता, दिग्दर्शक वडिल राकेश रोशन यांनीही टीजरवर प्रतिक्रिया देताना ‘गुज बंप’ लिहिले आहे.

सिद्धार्थ आनंदने फायटरबाबत बोलताना सांगितले, माझ्यासाठी हा अत्यंत उत्साहपूर्ण क्षण आहे. मी माझ्या जीवनात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण या दोन मोठ्या कलाकारांना एकत्र आणले आहे. हे दोघे प्रथमच एकत्र काम करणार आहे. हा एक अॅक्शन सिनेमा असेल, ऋतिकसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. या सिनेमाची कथा अत्यंत वेगळी आहे. ऋतिक यात वायुसेनेच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याची चर्चा असून हा सिनेमा देशप्रेमाने भरलेला असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER