प्रिया बेर्डेंच्या हृदयात फुलला वसंत

Priya Berde

रूपेरी पडद्यावर अभिनय करत असताना प्रत्येक कलाकाराला वाटत असते की आयुष्यात एक तरी अशी भूमिका मिळावी की त्यामुळे करिअरला कलाटणी मिळावी. आयुष्य अगदी तीनशेसाठ अंशाच्या कोनात बदलून जावं. आपला सहभाग असलेला सिनेमा वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या आठवणीत अगदी ताजातवाना रहावा. आणि हे स्वप्न जर खरं झालं तर तो सिनेमा, ती भूमिका कलाकारासाठी जीव की प्राण असते. असंच काहीसं झालं अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya berde) यांच्याहीबाबतीत आणि अर्थातच ज्या सिनेमाच्या आठवणीत त्या रमून गेल्या तो सिनेमा म्हणजे ऑल टाइम हिट असलेला अशीही बनवाबनवी. हा एव्हरग्रीन सिनेमा प्रदर्शित होऊन ३२ वर्षे लोटली, मधल्या काळात सिनेमाचं जग खूप बदललं. प्रेक्षकांच्या अभिरूचीचे पैलू बदलले तरीही या सिनेमाची गोडी जितकी आज चाळीशीत असलेल्या तरूणाईसाठी आहे तितकीच या सिनेमातील कलाकारांसाठीही. मग काय, बनवाबनवी सिनेमाच्या ३२ व्या वाढदिवशी प्रिया बेर्डे दिवसभर फक्त या सिनेमातील गाणी, संवाद, किस्से ऐकत होत्या. त्या दिवशी त्यांच्या गाडीत, घरात, फोनमध्ये हृदयी वसंत फुलताना ( Hridayi Vasant Phulatana ) आणि कुणीतरी येणार येणार गं याच गाण्याची धून वाजत होती आणि त्यावर प्रिया मनोमन डोलत होत्या.

अशीही बनवाबनवी या सिनेमात कमळीच्या भूमिकेत दिसलेल्या प्रिया बेर्डे यांचा या सिनेमातील नायक म्हणजे त्यांच्या खऱ्या आयुष्याचा जोडीदार लक्ष्मीकांत बेर्डे होता. तमाशा बोर्डाच्या मालकाकडे काम करणाऱ्या परशुरामच्या प्रेमात वेडी झालेली कमळी प्रिया यांनी चांगलीच वठवली होती. नोकरीसाठी नव्या शहरात राहण्यासाठी घर भाड्याने हवे असलेल्या दोन भावांना घरमालकीणीला विवाहित जोडपेच पाहिजे ही अट मान्य करण्यासाठी काय करावे लागते या कथेवर विनोदाचा धबधबा असलेला हा सिनेमा करायला मिळणे हीच खूप मोठी संधी आहे अशी कमेंटही प्रिया यांनी या सिनेमाच्या ३२ वर्षानंतरही असलेल्या टवटवीतपणावर केली. धनंजय माने इथेच राहतात का, ७० रूपये वारले, अगं बाई…जाऊबाई…नकाबाई जाऊ. सारखं सारखं त्याच झाडावर काय, हा माझा बायको पार्वती, नवऱ्यानं टाकलय हो बिचारीला, काय बाई आजकालच्या मुली…साधा नमस्कारही केला नाही, या केरसुणीचं पण तुमच्या टकल्यासारखं झालय बघा अशा अनेक संवादाने विनोदाची फोडणी म्हणजे हा सिनेमा. याच सिनेमातील हृदयी वसंत फुलताना या गाण्यानेही धमाल केली होती. ३२ वर्षांनंतर हे सगळं अगदी काल परवा घडत असल्याचं प्रियांना वाटतय इतक्या त्या या सिनेमाशी जोडल्या आहेत. कुणीतरी येणार येणार गं हे गाणं आज ३२ वर्षानंतरही आई होणाऱ्या पंचविशीच्या गर्भवतीच्या डोहाळजेवणात हमखास वाजतं हे या सिनेमाचं यश आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रिया त्यांच्या गाडीतून कुठेतरी बाहेर जात होत्या. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता तुम्ही म्हणाल की गाडी चालवत असलेल्या व्हिडियोत काय असे नवीन आहे. पण मजा ही आहे की गाडीत जे गाणं लावलं होतं ते होतं हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. सिनेमात सचिन, अशोक सराफ, सुशांत रे आणि लक्ष्मीकांत यांच्यासह सुप्रिया, अश्विनी भावे, निवेदिता आणि प्रिया बेर्डें या आठही कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. प्रिया सांगतात, हा सिनेमा जितका मनोरंजनाने भरला आहे तितकाच सिनेमाच्या शूटिंगवेळीही आम्ही खूप धमाल केली होती. या गाण्यावेळीही खूप मजा आली होती. त्यामुळेच प्रिया यांना सिनेमाच्या ३२ व्या रिलीज वाढदिवशी हे गाणं सारखं सारखं ऐकण्याचा मोह आवरला नाही. प्रिया ड्रायव्हिंग करत असताना हे गाणं फक्त ऐकतच नव्हत्या तर बसल्या बसल्या त्यांचा डान्सही सुरू होता.

प्रिया बेर्डे यांनी अनेक मराठी सिनेमा, मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या त्या मुंबईत एक हॉटेल चालवत असून त्यांना खाण्याचा खूप शौक आहे. पती लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली व त्यांनी ती अत्यंत चांगली निभावली. मुलगा अभिनय बेर्डे याच्यासोबत त्या रंपाट या सिनेमात दिसल्या होत्या. अभिनयासोबत त्या उत्तम डान्सरही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER