‘एचपी’ जगभरात कमी करणार नऊ हजार कर्मचारी; भारतातले ५००

बेंगळुरू : संगणक व प्रिंटर उत्पादनातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी ‘एचपी’ जगभरातील नऊ हजार कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे.

याबाबत गेल्या आठवड्यात माहिती देताना कंपनीने सांगितले की, २०२० पर्यंत जगभरातील सात ते नऊ हजार कर्मचारी कमी केले जातील.

नफा वाढावा आणि उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी कार्यप्रणाली पुनर्रचनेअंतर्गत ही कपात करण्यात येणार आहे. ‘एचपी’चे जगभरात ५५ हजार कर्मचारी आहेत.

भारतातील तज्ज्ञानुसार कंपनीच्या या योजनेचा परिणाम एचपी इंडियावरदेखील होईल. कंपनीच्या योजनेबाबत माहिती असणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने काही मॉडल्सचं उत्पादन थांबवलं असून खासगी संगणकांच्या मागणीत सातत्याने घट होते आहे.

भारतात कर्माचारी कपात होणं जवळपास निश्चित आहे. द हेड हंटर्स इंडियाचे सीईओ क्रिस लक्ष्मीकांत यांच्यानुसार, भारत हा एचपीसाठी मुख्य लक्ष्य असलेल्यांपैकी एक आहे; पण एचपी इंडियाकडून ५०० कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. एचपी इंडियावर परिणाम नक्कीच जाणवेल.

‘भारतातील किती कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. जागतिक स्तरावर ही कपात होते आहे, कुठे किती कपात होईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

‘ असे कंपनीने म्हटले आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, एक महिन्यापूर्वीच कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात बदल झाला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कपात करण्याची बातमी आली आहे.