…पण काँग्रेसचा उपमुख्यमंत्री नाही याची खंत- नितीन राऊत

Dr. Nitin Raut

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन तर केले; मात्र सरकार स्थापनेपासूनच या तिघांमध्येही समन्वयाचा अभाव सतत दिसून आला आहे. याच कारणामुळे विरोधकही हे सरकार अंतर्गत वादामुळेच कोसळेल असा दावा करत असतात.

आता तर कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेते, महाविकास आघाडीचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी खुद्द सरकारमधली खदखद बाहेर काढली आहे. विकासकामांच्या फलकावर नियमानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे असतात. तेव्हा तेथे आमचे छायाचित्र नसते म्हणून खंत नाही; पण काँग्रेसचा उपमुख्यमंत्री नाही याची खंत नक्कीच आहे, अशी खंत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा श्वास गुदमरतोय असे म्हटले जाते, अशी विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये आतापर्यंत अनेक कॉंग्रेस नेत्यांनी सरकारविरुद्ध भूमिका घेतली आहे किंवा सरकारमध्ये कॉंग्रेसला नगण्य स्थान असल्याची खंतही अनेकांनी बोलून दाखवली आहे. मग ती एखाद्या सरकारी निर्णयासंबंधी असो वा शासकीय कामाच्या फलकासंबंधी. अशा सर्वच ठिकाणी कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीने विचारात न घेता निर्णय घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्वतंत्रपणे फलक लावावे लागतात.

काँग्रेस नेत्यांची महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी आहे. ते वरिष्ठांना पत्र लिहून व्यक्तही होत आहेत- असे विचारले असता डॉ. राऊत म्हणाले, कोरोना साथीमुळे शारीरिक अंतर राखणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठलीही समस्या पत्राद्वारे कळवली जाते. त्यावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्न मार्गी लावला जातो.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आमच्या व्यथांबाबत पत्रव्यवहार करीत असतात, असेही नितीन राऊत यांनी सांगितले. तीन पक्षांचे सरकार असले तरी काँग्रेस कुठेच पुढे दिसत नाही. काँग्रेस सरकारमध्ये विलगीकरणात गेली आहे काय, असे विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस विलगीकरणात जाऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष गावागावांत, घराघरांत आहे. कोणता पक्ष विलगीकरणात जाईल हे लवकरच कळेल, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER