महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झालेल्या नाना पटोलेंचा राजकीय प्रवास कसा होता?

Nana Patole - Congress

अनेक दिवस सुरु असलेली महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची चर्चा अखेर संपलीय. महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी आता पक्षाने नाना पटोले यांच्याकडे सोपवली आहे. नाना पटोलेंच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवडलं जाणं अनेक अर्थाने बघता येऊ शकतं. काही दिवसांपूर्वीच ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी असावा अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागणार का अशी चर्चाही सुरु झाली होती. पण काँग्रेस पक्षाकडून नंतर अनेक दिवस याविषयावर काही निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर आता नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नाना पटोलेंची आक्रमक राजकीय नेता अशीही महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे. शेतीप्रश्नांची त्यांना उत्तम जाण असल्याची अनेक उदाहरणं आहेत. विदर्भातल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये नाना पटोलेंचं नाव घेतलं जातं. शिवाय ओबीसी राजकारणाचा चेहरा म्हणूनही नानांकडे बघितलं जातं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नानांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु आता काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा नानांनी दिला आहे. नक्की कशी होती नाना पटोलेंची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया.

2019 च्या निवडणुकीआधी तेव्हाचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसांनी काढलेली महाजनादेश यात्रा आठवते का ? यायात्रेच्या विरोधात वातावरण तसं दिसत नव्हतं. पण या यात्रेच्या विरोधात नानापाटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढली आणि महाजनादेश यात्रेची चर्चाच फिस्कटून टाकली. भाजप सरकार जनतेची फसवणूक करतय भारताच्या 70 वर्षाच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पहिले नाहीत असं म्हणत पटोलेंनी भाजप वर टीका केली होती.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पटोलेंनी कॉंग्रेससाठी प्रचंड मेहनत घेतली असली तरीही ते टीकेचे शिकारही झाले होते. त्याला कारण ठरलं भंडारा जिल्ह्यातलं खैरलांजी हत्याकांड. खैरलांजी हत्याकांडातल्या आरोपींच्या बाबतीत पटोलेंची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्यावर उत्तर देताना मी जातीयवादी असतो तर लोकांनीच मला राजकरणातून हाकलून लावलं असतं असं उत्तर पटोलेंनी दिलं होतं.

2019 च्या लोकसभा निवडणूक मात्र नाना पटोलेंसाठी अपयश ठरली. नागपुरात नितिन गडकरीं विरोधात कॉंग्रेसकडून उभे असलेले नाना निवडून येऊ शकले नाहीत.  पुढे लोकसभेनंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विदर्भातल्या साकोली मतदार संघातून ते निवडून आले. हा नाना पाटोलेंनी बांधलेला मतदार संघ होता.

2009 मध्ये नाना पटोले भाजपच्या तिकीटावर याच मतदार संघातून निवडून आले होते.  2019 च्या लोकसभेला नाना पडले असले तरीही ती निवडणूक सोडली तर या आधी कोणत्याही निवडणुकीत नाना पडले नव्हते.

नानांची सुरुवात झाली विद्यार्थी संघटणेपासून. विद्यार्थी संघटनेत असतानाच 1990 मध्ये त्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत विजय मिळवून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1999मध्ये कॉंग्रेसने लाखांदूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि नाना आमदार म्हणून निवडून आले. 2004 ची निवडनुकही याच मतदारसंघातून लढवून नानांनी विजय मिळवला.  शेतकर्‍यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणार्‍या नानांनी शेतकर्‍यांच्या मुद्यावरच कॉंग्रेसवर टीका करत 2008 मध्ये पक्ष सोडला.

2009 मध्ये नानांनी अपक्ष उभं रहात लोकसभा निवडणूक लढवली पण त्यात ते विजयी होऊ शकले नाहीत. पुढे जुलै 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि साकोली विधानसभा मतदार संघातून निवडून आले. भाजपने 2014 मध्ये नानांना भंडारा-गोंदिया लोकसभामतदार संघातून भाजपने उमेदवारी दिली. प्रफुल्ल पटेलांसारख्या मातब्बर नेत्याला हरवून नानांनी लोकसभेत प्रवेश केला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांवर जोरदार टीकाकरत भाजप सोडलं आणि पुन्हा कॉंग्रेसला जवळ केलं. लोकसभेत पडले असले तरीहीविधानसभेला साकोली मतदार संघातून निवडून येऊन आमदार झालेल्या नाना पटोलेंची महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. या पदाचा कारभार सांभाळत असतानाच आता नाना पटोले यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यांनतर त्यांनी आता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. महाराष्ट्र काँग्रेसचे नवे अध्यक्ष आता नवे बदल करत काँग्रेस पक्षाला कसं बळ देतात यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER