पटेल किती खरे किती खोटे? – पवार पंतप्रधान होणार होते का?

Sharad Pawar & Praful Patel

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त एक लेख लिहिताना काही रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे.अर्थात त्यांची पवार निष्ठा लक्षात घेऊन त्यांनी काही तथ्य लपविली असण्याची शक्यता आहे. मात्र पटेल यांच्या लेखाने खळबळ निश्चितच उडवून दिली आहे.

नरसिंह राव यांनी शरद पवार यांना डावलले.पंतप्रधान होऊ दिले नाही. केंद्रामध्ये टिकू दिले नाही आणि महाराष्ट्रात परत पाठवले असे पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांच्या या दाव्याला दुसरी बाजूदेखील आहे. पवार हे त्यावेळी सर्वमान्य काँग्रेस नेते होते असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पटेल यांनी केला आहे.मात्र जुनेजाणते नेते सांगतात की त्यावेळी नरसिंह राव यांचा काँग्रेस पक्षात पवार यांच्यापेक्षा अधिक प्रभाव होता. राष्ट्रीय राजकारणात क्रमांक एक वर घेण्यासाठी पवार यांना अनेकांनी रोखले ही वस्तुस्थिती असली तरी पक्षांतर्गत विरोधकांवर पवार मात करू शकले नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे.

शरद पवारांनी काँग्रेसला दिलेली ताकद पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या ‘दरबार राजकारणात’ ही संधी हुकली. ज्यामुळं त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झालं, असं राष्ट्रवादीचे नेते पटेल यांनी म्हटलंय. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारं काँग्रेस सरकार बनलं असतं पण नरसिंह रावांमुळं देवेगौडा सरकार आलं, असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. काँग्रेसची काम करण्याची पद्धत ‘सुनियोजित बंड’ घडवून आणणे, आपल्या पक्षात स्वतःच क्षेत्रीय नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे अशी आहे. जे पवारांसोबतही केले गेले. पहिला फटका पवारांना 1989 ला आर के धवन, माखनलाल फोतेदार यांनी मोठे षडयंत्र करून देण्याचा प्रयत्न केला पण पवार यांनी तो हाणून पाडला, असंही पटेलांनी म्हटलंय. दिल्ली स्वरांनी पवारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा प्रयत्न केला पण आमदार भक्कमपणे त्यांच्या बाजूने उभे राहिले असे पटेल यांनी म्हटले आहे.

राजीव गांधींच्या हत्येनंतर फक्त पवारांना दूर ठेवणे या एका अजेंड्यासाठीच नरसिंह राव यांना आणले. देशभर काँग्रेसला पवार हवे होते. 1996 मध्ये पवार पंतप्रधान असणारी काँग्रेस सरकार बनू शकत असतानाही फक्त नरसिंह रावांमुळे देवेगौडा सरकार बनली. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, मी अधिकाराने हे सांगू शकतो, असा दावा देखील प्रफुल पटेलांनी केला आहे.

त्यांनी म्हटलंय की, केसरीच्या वेळी जेव्हा गुजराल पंतप्रधान झाले. तेव्हा आम्ही आमच्या नजरेसमोर पवारांनी आपल्या स्वताच्या महत्वाकांक्षांचा गळा पक्षासाठी दाबला. सॉफ्ट स्टँड घेतला आणि अगदी सोपे असलेले पंतप्रधान पद सोडले हे आम्ही बघितले आहे. 13 दिवसात पडलेले वाजपेयी सरकार फक्त पवारांमुळे पडले. पण तरीही त्यांना मिळायला हवे होते ते स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिले नाही, असं पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसने अपमान केला. पार्लियामेंटरी पार्टीचे मुख्य बनवून त्यांनाच अंधारात ठेवले जायचे. महाराष्ट्रात आणि केंद्र स्तरावर त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या सतत गोष्टी घडवल्या जायच्या, या सगळ्या प्रकारांनी व्यथित होऊनच इनफ इज इनफ असे म्हणत पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली असे पटेल यांनी म्हटले आहे.

शरद पवार अजूनही पंतप्रधान होऊ शकतात अशी आशा पटेल यांनी या लेखात व्यक्त केली आहे. पटेल यांनी म्हटलं आहे की, आज 80व्या वर्षात पवार साहेबांना ज्या पदावर पाहायचं आहे ते अजून पाहिलेलं नाही. जर महाराष्ट्रानं ठरवलं साथ दिली तर हे शक्य होऊ शकतं जर ममतांचे 36 खासदार निवडून येऊ शकतात जगनमोहन यांचे 28 खासदार निवडून येऊ शकतात तर महाराष्ट्रांचे 48 खासदार पवारांच्या मागे का उभे राहू शकत नाही? जेव्हा आपण पवार साहेबांचा 85 वा वाढदिवस साजरा करू त्यावेळी आपलं स्वप्न साकार झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही आणि या सबंध महाराष्ट्रात पवार साहेबांवर प्रेम केलं आहे पण पवार साहेबांच्या मागे राहिलेलं नेतृत्व करू शकतात ती मला खात्री आहे, असं त्यांनी म्हटलंय. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे केवळ सहा खासदार आहेत शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी मध्यंतरी माध्यमांमधे चर्चा घडवून आणली होती, त्यावर शरद पवारांनी स्वत: पूर्णविराम दिला. पटेल किती खरे किती खोटे? पवार पंतप्रधान होणार होते का? की होणार ?? हे येणारा काळच सांगेल पण आज तरी शरद पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER