ज्यांच्याकडे ‘आधार’ कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे करणार?

Coronavirus Vaccine - Aadhar Card - Bombay High Court
  • हायकोर्ट म्हणते सरकारने धोरण ठरवायला हवे

मुंबई : ज्यांच्याकडे ‘आधार’ कार्ड (Aadhar Card) नाही त्यांना कोरोना (Corona) प्रतिबंधक लस (Vaccine) दिली जात नाही. सर्वांचे लसीकरण करायचे म्हटल्यावर असे करून कसे चालेल? हा संपूर्ण देशाशी संबंधित विषय असल्याने सरकारने यावर धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा, अशी विनंतिवजा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गुरुवारी केली.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या परिस्थितीची सरकारकडून केली जाणारी हाताळणी याविषयीच्या काही जनहित याचिका व न्यायालयाने स्वत:हून दाखल करून घेतलेली याचिका या दोन्हींवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे लसीकरणासाठी ‘आधार’ कार्डाच्या गरजेचा विषय निघाला.

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या (TISS) क्रिमिनॉलॉजी अँड जस्टिसचे प्राध्यापक विजय राघवन यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणले की, ज्यांच्याकडे ‘आधार कार्ड’ नाही अशा कैद्यांना तुरुंगात लस दिली जात नाही. यासंबंधी सुयोग्य आदेश देण्याची त्यांनी विनंती केली.

यावर मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारला विचारले की, एखाद्या कैद्याकडे खरंच ‘आधार‘ कार्ड आहे की नाही हे शोधण्याची तुमच्याकडे काय यंत्रणा आहे? त्यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना विचारले की, समजा आरोपीकडे ‘आधार’ कार्ड आहे का, असे दंडाधिकार्‍यांनी त्याला विचारले व त्याने ‘नाही’, असे सांगितले तर मग काय करणार? तुम्ही ते कसे तपासणार?

परदेश प्रवास करणार्‍यांची जशी ‘बायोमेट्रिक’ माहिती घेतली जाते तशी काही व्यवस्था कैद्यांसाठी करता येईल का, असेही न्यायालयाने विचारले.

यावर अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणाले की, आधार कार्ड पाहून लसीकरण करणे हा राज्यातील तुरुंगांमध्ये सध्या एक जटिल प्रश्न झाला आहे. अनेक कैदी परकीय नागरिक असल्याने त्यांच्याकडे ‘आधार’ कार्ड नाही.

न्यायालयाने म्हटले की, व्यक्तीची नेमकी ओळख पटविण्यासाठी व देशपातळीवर ‘डेटाबेस’ तयार करण्यासाठी ‘आधार’ कार्ड महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे केंद्र सरकारने तरी यातून काही तरी मार्ग काढायला हवा.

अ‍ॅडव्होकेट जनरल कुंभकोणी म्हणाले की, अशा परिस्थितीत काय करावे, यासंबंधी केंद्राकडे आम्ही विचारणा केली आहे व त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button