हा” सुखाचा चेहरा “ओळखायचा कसा ?

सुखाचा चेहरा

आपल्या लिखाणात पु. ल. देशपांडे म्हणतात ,यावर्षी हे नवीन वर्ष सुखाचे जावो अशी इच्छा व्यक्त करणारी कार्ड आली .सुखाची भानगड कशी काय आहे ? हे मात्र इतकी नवीन वर्ष जुनी झाली तरी माझ्या नेमकी ध्यानात आली नाही. ज्या कोणाला समजली असेल त्याचा सदरा आपल्या अंगाला बसतो काय ते पाहायला हवं .पण सुख नावाचं काहीतरी आहे आणि ते प्रत्येकाला मिळाव असं वाटतं असतं ,मग कोणी ज्योतिषच्या पुढे हात पसरतो, तर कोणी मंगळाच्या भ्रमण तपासायला लागतो .प्रत्येकाच्या नाना तऱ्हा असतात.

म्हणूनच मला तरी वाटतं की सुख हे रंगीबेरंगी चष्मासारखं असतं. ते ज्यातून बघावं तसं दिसतं. पुलं च पुढे म्हणतात,की कॅलेंडर वरच्या पानाप्रमाणे सुखाची व्याख्याही बदलत असावी कारण ज्याला आपण काल सुख समजत होतो ते आपल्याला आज आज सुख वाटेलच असं नाही. शिवाय दुःखाच्या निर्मितीचा झपाटा सुखापेक्षा मोठा असतो आणि ती निर्मितीही अधिक टिकाऊ सुख हे मानण्यावर असतं ,असं म्हणतात .म्हणून म्हणतो नववर्ष हे सुखाचा चेहरा ओळखायला लावणार ठरो !

फ्रेंड्स ! पुलंच्या लिखाणाला तोड नाही हेच खरे ! शाल्मलीचे लग्न होऊन चार महिने झाले. नवरा सकाळपासून कामावर जातो. आणि परत केव्हा येईल याची वेळ ठरलेली नसते. कामाप्रमाणेवेळ पुढे-मागे होऊ शकते. ती दोघंच जण मुंबईत असतात. शाल्मलीला तो येईस्तोवर करमत नाही. थोड्याच दिवसात तिने एक कोर्स जॉईन केला. अभ्यासाला सुरुवात केली. तसेच ती गाणं शिकलेली असल्याने, बिल्डिंगमधल्या मुलांना गाणं शिकवते.

परंतु सहिता त्यामानाने छोट्या गावात राहते. सासर आणि माहेर त्याच गावात. त्यामुळे पूर्वीपासूनचे लोक ओळखीचे. चार-पाच घरतर खूपच आपुलकीची ,जिव्हाळ्याची ! तिचा जास्तीत जास्त वेळ त्या चार पाच घरांमध्ये जाण्या येण्यात जातो. त्या लोकांनाही हिचा खूप आधार वाटतो. आणि त्यांना धरून ठेवण्यात संहिता ला देखील आनंद आहे.

माझी एक मैत्रीण खेड्यातून राहते. घरचा व्यवसाय शेतीचा. तिचे मिस्टर ग्रॅज्युएट. ती स्वतः एमबीए झालेली. तिला तिचा दररोजच्या रूटीनमध्ये जीव रमत नाही असं वाटतं. दररोज तेच तेच कंटाळवाणं काम, स्वयंपाक पाणी, घर आवरणं यासाठी आपला जन्म झालेला नाही असं तिला वाटतं. तर त्याउलट एक कम्प्युटर मधली मुलगी आयटी क्षेत्रात काम करणारी, आपल्या एवढ्या मोठ्या पॅकेज चा मोह टाळून ती सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी खेड्याकडे परत येण्याचा तिने निर्णय घेतला.

प्रत्येकाचे सुखच कसे वेगवेगळे असते हेच आपल्याला कळते.

मात्र बरेच वेळा खरोखरच बरेच काही शिकवत कॅलेंडरची पानं बदलतात त्याप्रमाणे सुखाची व्याख्या ही आपली देखील बदलत जाते. आजच्या घडीला मला खूप गोष्टी कराव्याशा वाटतात. त्यामुळे घरातील सीनियर स्त्रिया जेव्हा म्हणतात, की नाही ! माझं मन सध्या त्यामध्ये रमत नाही .आतून इच्छा झाली पाहिजे ,काहीतरी करण्याची किंवा ते मला झेपणार नाही. तेव्हा मला फार आश्चर्य वाटतं. परंतु मी जेव्हा मागे वळून पाहते. त्यावेळेला माझ्याच लक्षात येते की मला पूर्वी ज्या गोष्टी आवडायच्या ,त्या सगळ्या आज आवडतातच असं नाही किंवा जमतही नाहीत. पूर्वी मला रांगोळ्या घालायला खूप आवडायचं. पण आता मला दोन्ही मुलेच ! अशावेळी सण समारंभाच्या वेळी प्रत्येक गोष्ट स्वतः करावी लागते. म्हणजे पूजेची तयारी ,डेकोरेशन ,स्वयंपाक गोड धोड , जेवण खाणे, परत येणार जाणार , पै पाहुणा , खरेदी , घरातील दुरुस्ती, अशावेळी रांगोळी काढने वगैरे प्रकार नको वाटतात.

किंवा पूर्वी मला आणि माझ्या जावेला सवय होती की कार्यक्रम आटोपला, दुपारचा चहापाणी झाले की सगळेजण आराम करायचे, आम्ही दोघी मस्तपैकी मार्केटची सफर करून घ्यायचो, संध्याकाळी परत कामावर हजर .पण मागच्या वेळ आली तेव्हा तिचं तीच म्हणाली,”राहू दे मानसी !आपण गप्पाच करूया !”

पण बरं का मंडळी बरेचदा असं होतं, की जेव्हा जी जी सुख हवी असतात.. त्यावेळी ती शक्य होत नाही, बघाना ! मुले लहान असताना आपली वय लहान असतात, फिरायची हौस असते, अंगात ताकद असते. तोपर्यंत फिरायला मिळेलच याची खात्री नसते. अडचणी अनंत असतात, लहान मुले त्यांची आजारपण, पुढे त्यांच्या शाळा, वाढणाऱ्या अभ्यास, घरातली वयोवृद्ध ,त्यांच्या तब्येती, आर्थिक सुबत्ता, मिळणाऱ्या सुट्ट्या, अगदी जोडीदाराला आवड असणे किंवा नसणे इथं पासून अनंत अडचणी येतात .आणि पुढे जेव्हा थोडी मोकळीक मिळते, त्यावेळी आपल्या स्वतःची तब्येत साथ देत नाही .किंवा जी मजा ,किंवा ओढ फिरण्याची त्यावेळी होती,ती बरेच जणांची टिकतेच असे नाही.

फ्रेंड्स! सुख हे प्रत्येकाच्या मानण्यावर,समजण्यावर आहे,सुख समाधानात आहे. सगळ्यात जास्त माणूस दुःखी होतो ती सदैव दुसर्यासोबत तुलना करून .सगळ्यांकडे आहे म्हणून ती गोष्ट आपल्याला हवी असते आणि ती मिळाली नाही की दुःख होते. ही भावना अधिक तीव्र झाली की दुसऱ्याचा आनंदही आपल्या दुःखास कारणीभूत होतो , आपण दुःखी होऊन जातो की जगातील सर्वात दु :खी प्राणी फक्त आपणच असं वाटायला लागत.

ऐक गोष्ट आहे . एक माणूस पर दु :खी होता. तो काय विचार करायचा ,आपल्या वाट्याला इतके दुःख का ? दुसऱ्याच्या भाग्याचा त्याला हेवा वाटत असे. एकदा देव खरं त्याच्या स्वप्नात आला आणि त्याला म्हणाला उद्या मी गावातील सर्वांनाच दुःख निवडण्याची संधी देणार आहे. दुःखाचे गाठोडे बांधून सकाळी मंदिरात ये. त्याला खूप आनंद झाला. सकाळी आपले गाठोडे घेऊन तो मंदिरात निघाला .लहानात लहान गाठोडे कसे घेता येईल याचे विचार त्याच्या मनात सुरू होते. गावातील सगळेच आपापले गाठोडे घेऊन मंदिराकडे निघाले सारेच एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते. ज्यांना तू आनंदी समजत होता त्यांची गाठोडी त्याच्यापेक्षाही , मोठी होती. आता मात्र त्याला भीती वाटू लागली .काय काय असेल त्यांच्या गाठवड्यात? तसा तो अंदाज बांधू लागला. मग सगळ्यांनी समोर गाठोडी ठेवली, देव बोलू लागला. तुम्ही सर्व लोक तुमच्या दुःखाला कंटाळला आहात. ती तुम्हाला नको आहे त्यामुळे ती बदलण्याची एक संधी मी तुम्हाला देत आहे पण नंतर मात्र माझ्या नावाने कुरकुर करू नका .घंटा वाजली आणि सगळेजण धावले .आपले गाठोडे कोणी उचलू नये म्हणून हाही जोरात धावला. पण काय आश्चर्य प्रत्येकाने आपलेच गाठोडे उचलले. कोणाला माहित कोणाच्या गाठोड्यात काय आहे ? किमान आपल्या दुःखाची आपल्याला ओळख तरी आहे त्याच्या सोबत जगण्याची सवय झाली आहे असा विचार सर्वांनीच केला.

म्हणूनच फ्रेंड्स ! प्रत्येकाचे सुखदुःख वेगळी असतात. जीवन जगण्याच्या कल्पना वेगळी असतात तुलना करून सुखांचे मोजमाप कसे करता येईल त्यापेक्षा आपल्या ताटात काय आहे त्याचा आनंद घ्या. आपल्या हातात जे पत्ते आली आहे त्यानेच खेळ खेळावा लागतो. आपल्यातील पूर्ण कौशल्य वापरून डाव रंगवायचा आणि खेळाचा आनंद घ्यायचा .कोण किती कौशल्यपूर्ण वापर करतो त्यावर तुमच्याकडच्या सुखाचा रंग अवलंबून असतो, तो तुम्हीच ठरवायचा असतो ! गुलजार यांच्या कवितेत एक सुंदर ओळी आहेत — एक जिंदगी है, जो सा s रे s ग s म s सुना कर बहला रही थी | और हम है की, सारे ‘ गम ‘ समझकर उसे कोस रहे थे |

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER