पैसे घेण्यासाठी आला आणि सुशीलकुमार जाळ्यात अडकला

Maharashtra Today

गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्ली पोलिसांना हुलकावणी देत असलेला आॕलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार(Sushilkumar)एक लाखाचे बक्षिस जाहीर केल्यावरही गवसत नव्हता, मात्र त्याच्याजवळचे पैसे संपले आणि आपला साथीदार अजयकुमार शेरावतसह तो पैसे घेण्यासाठी दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशनबाहेर आला आणि तेथेच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. सुशील व अजय या दोघांनाही रोहिणी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

ती दुचाकी हँडबाॕल खेळाडूची!

अपर पोलीस आयुक्त अत्तार सिंग आणि पोलीस निरिक्षक शिवकुमार यांच्या नेतृत्वातील दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुशील व अजय यांना मुंडका स्टेशनबाहेर अटक केली. हे दोघे येथे त्यांच्या एका सहकाऱ्यामार्फत पैसे घेण्यासाठी दुचाकीवर आले होते. सुशील दुचाकी चालवत होता तर अजय मागे बसलेला होता. ते वापरत असलेली दुचाकी भारताच्या महिला हँडबॉल संघातील एका खेळाडूची होती अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

सहा राज्यांमध्ये भटकंती

दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार अटक टाळण्यासाठी सुशील व अजय हे सारखे जागा बदलत होते आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये भटकत होते. लगतच्या सहा राज्यांमध्ये त्यांचा वावर होता. सुशीलचा साथीदार अजय शेरावत याच्यावरही 50 हजाराचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. अजय हा छत्रसाल स्टेडियममध्ये शारीरिक प्रशिक्षक आहे आणि विकासपुरी भागाचे नगरसेवक काँग्रेसचे सुरेश कुमार शेरावत यांचा मुलगा आहे.

अपहरण, खून आणि षडयंत्राचा गुन्हा

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी झालेल्या बेदम मारहाणीत सागर धनखड (Sagar Dhankhad)या 23 वर्षीय तरुण पहिलवानाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुशीलकुमारवर अपहरण, खून आणि गुन्हेगारी षडयंत्र रचल्याचा आरोप आहे, कारण घटना घडली त्यावेळी सुशीलकुमार तिथे होता आणि छत्रसाल स्टेडियमवर त्याचे सासरे प्रशिक्षक सतपाल व सुशीलकुमार यांचीच हुकूमत चालते.

घर खाली करण्याचा वाद

पोलिस सुत्रांनुसार, मयत सागर धनखड आणि त्याचे काही मित्र दिल्लीच्या माॕडेल टाऊन भागात छत्रसाल स्टेडियमजवळच्या एका घरात राहात होते. हे घर सुशीलकुमारशी संबंधित होते आणि सागर व मित्रांना हे घर खाली करण्यास सांगितले होते. ते घर खाली करण्यावरुन 4 मे रोजी झालेला वाद हा या हत्येमागचे कारण असल्याचे मानले जात आहे.

व्हिडीओ चित्रिकरणाने आला गोत्यात

समोर आलेल्या माहितीनुसार 4 मे रोजी रात्री सागर धनखड व त्याच्या साथीदारांना जबरदस्तीने स्टेडियममध्ये आणण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. आपले ऐकले नाही तर आपण काय करू शकतो अशी दहशत निर्माण करण्यासाठी सुशीलने या प्रकरणाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याचे त्याच्या एका पंटरला सांगितले होते आणि ही क्लिपच त्याला या प्रकरणात अडकवण्यास कारणीभूत ठरली. व्हायरल झालेल्या या क्लीपमधूनच घटनेवेळी सुशील तिथे उपस्थित होता हे दिसुन आले आणि त्यामुळे तो या खूनाच्या गुन्ह्यात अडकला.

पोलिसांनी मांडलेल्या घटनाक्रमानुसार, सागर मरण पावल्याचे समजताच सुशीलने 5 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजताच घर सोडले. शालिमार बाग येथे तो अजयला भेटला आणि तेथून कारने ते उत्तराखंड मध्ये गेले. तेथून त्यांनी मुझफ्फरनगर आणि तेथून दिल्लीला परतले. 6 मे रोजीच्या मेरठ टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सुशील दिल्लीकडे येत असल्याचे पोलिसांना दिसून आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button