“ताणाचे धनुष्य ताणावे तरी किती ! “( भाग 2)

Stress

काल आपण टेन्शन म्हणजे काय ? ते कस ओळखायचं आणि मदत घेणे किती आवश्यक ते बघितलं .तसा ताण येतो म्हणजे नेमका कुठे येतो ? कोणत्या गोष्टीमुळे साधारण ताण उद्भवतो? अशासारखे प्रश्न कायमच आपल्या मनाला पडत असतात . कुठल्याही गोष्टीला उत्तर शोधायचे तर आपल्याला त्या प्रश्नाचा सांगोपांग विचार करावा लागतो .मुळापर्यंत आपण पोहोचलो तर उत्तर मिळवणे सोपे जाते.

मन नेमकं आपल्या शरीरात असतो कुठे ? हृदयात ? डोक्यात ? हो ! मेंदूमधील मल्टी स्किल अशी पेशी म्हणजे मन आहे .असे शास्त्रज्ञ सांगतात. ह्या पेशी मूर्त व अमूर्त अशी दोन प्रकारची कामे करतात. यामध्ये मूर्त म्हणजे सरळ सरळ दिसणारी ,दररोजची कामे. विविध स्नायूंचा वापर ,तोल सांभाळणे. स्पर्शज्ञान म्हणजे नर्व्हस सिस्टिमशी संबंधित कामे .तर अमूर्त मनात विचार, भावना, वर्तन संवेदना, स्मृती, बुद्धी ,तारतम्य विवेक यांचा समावेश होतो.

म्हणूनच मूर्त कार्याशी संबंधित समस्या या न्यूरोलॉजिस्ट सोडवतात तर अमूर्त कार्याशी संबंधित समस्या मनोविकार तज्ञ व सायकॉलॉजिस्ट सोडवतात.

  • टेन्शन किंवा ताण अशा अमूर्त कार्याशी संबंधित आहे.
  • अनिश्चितता: कुठल्याही गोष्टीतली अनिश्चितता ही प्रत्येकाच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण करते त्यामुळे त्याचा त्रास होतो . सध्यपरिस्थितीमध्ये प्रत्येकाला असणारा ताण याच प्रकारचा आहे. यासाठी कोरोना या आजाराची अनिश्चितता आणि ती किती काळ तशी चालू राहील ?याचे उत्तर कोणाजवळच नाही.
  • भविष्यकालीन भीती: ताण का येतो ?यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात , जसे काही ताण हे केवळ भविष्यात काही वाईट,किंवा चुकीचे घडू शकते या केवळ काळजीतून निर्माण होतात .याला वास्तवाचा आधार फार कमी किंवा नसतोच.

उदाहरणार्थ लोकलच्या प्रवासात एका मैत्रिणीने निशाच्या मुलीची पत्रिका पाहून तिला विसाव्या वर्षी गंडांतर आहे असे सांगितले होते. या एका गंडांतर शब्दाने निशाला पुढची 18 वर्ष छळलं. तिची मुलगी सध्या फक्त दीड- दोन वर्षाची असेल. पण निशाच्या मनात पुढच्या गोष्टींचा एवढा ताण होता की मुलीला थोडा खोकला आला किंवा तिचे पोट दुखले तर निशा पार घाबरून जाते. बरीच संकट , प्रश्न हे आपल्याला जवळून बघताना समस्या वाटतात. पण तटस्थपणे बघितलं तर मुळात तिथे ताण येण्याजोगे काहीही नसतं.

संजीवनी व तिचे मिस्टर सध्या दोघेजण घरात राहतात. करोना काळामुळे कुणी, कुणाकडे जात येत नाही .खिडकितुन बघितलं तरी फार कोणी फिरताना दिसत नाही. दोघांची वय 65 ते 70 आहेत. त्यामुळे मुलेही दुरून आई-बाबा तब्येतीची काळजी घ्या ,बाहेर निघू नका .अशा सूचना देतात. संजीवनी ताई घरातले काम करून कंटाळून जातात . तशी त्यांना साफसफाईची आणि वाचनाची आवड आहे ,पण त्यामुळेही त्यांना थकवा येतो.पुन्हा बोलायला कोणी नाही. त्यामुळे जरा कधी त्यांना छातीतून बारीक जरी कळा आल्या तरी त्यांना आपल्याला हार्ट अटॅक तर नाही येत आहे, असं सारखं वाटत राहतं .आणि त्या विचाराचा त्यांना खूप त्रास होत राहतो.ते त्यांचा सतत पाठपुरावा करतात .हे विचार आणि लक्ष विचलित करण्यासाठी दुसरं काही नसल्याने सारखं लक्ष त्या बारीक दुखण्याकडे जात राहते. त्रयस्थ म्हणून बघणार्‍यांना हा केवळ काल्पनिक ताण असल्याचं जाणवत असतं .पण त्या व्यक्तीसाठी मात्र हा निश्चितपणे काहीतरी गंभीर प्रकार असतो.

भूतकालीन घटना: काही गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या असतील, तरी त्यांच्या आठवणीने सुद्धा आपल्याला ताण येत असतो. माधवीला कपड्यांचे कपाट आवरत असताना ,एखादी जुनी पण घडी न मोडलेली साडी दिसते. आणि तिला आठवतं नणंदेच्या घरचे लग्न ! अलकाताईनी बघा मला किती हलक्या प्रतीची साडी दिली होती लग्नात! त्याऐवजी दिली नसती तरी चालली असती! माहित आहे ,ते मोठ्या घरचे ,श्रीमंत. म्हणून का आमची अशी किंमत करायची ! अशासारखे “बिनबुडाचे ” स्वसंवाद आपण करतो आणि ताण घेत राहतो.

ताणाची कारण शोधत असताना जसा विचारांचा विचार करावा लागतो, तसाच भावना आणि त्यांच्या विविध छटा यांचाही विचार करावाच लागतो. या भावनांच्या स्वतःच्या अशा काही विंग्ज किंवा आपण त्याला अपार्टमेंट म्हणू, असे असतात. उदाहरणार्थ A बिल्डिंग. यात चिंता ,द्वेष ,मत्सर, संशय सूड ,खुन्नस तर B मध्ये हुरहूर, भीती ,असुरक्षितता ,अनिश्चितता ,कौटुंबिक व सामाजिक वातावरणातील तणाव असतात.C मध्ये नैराश्य ,मरगळ ,संताप आक्रमकपणा ,राहतो तर D मध्ये खंत , अपराधीपणा, सगळे सदोष स्वतःच्या माथी आणणाऱ्या या भावना आणि त्या नुसार वर्तन करणारे राहतात.
वरील सर्व प्रकारच्या भावनांचे नियोजन केले नाही तर ताण वाढतो.

ताण वाढला की त्याचे परिणाम शारीरिक-मानसिक, भावनिक ,त्याच प्रमाणे आपल्या कृतीवर आणि आणि अर्थातच परिणामांवर होत असतो.

# ताण निर्मिती जिथून होते ते मार्ग हि भरपूर आहेत.

  • व्यवसायाशी संबंधित ताण: हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत.
  • भूमिका धिष्टीत ताण :, म्हणजे आपण ज्या वेळी ज्या रोलमध्ये असतो त्याचे ताण विभिन्न असतात . उदाहरणार्थ एक कर्मचारी म्हणून एक नवरा म्हणून किंवा एक आई म्हणून सासू म्हणून इत्यादी.
  • आंतरवैयक्तिक.: समाजात वावरत असताना सोशल स्किल्स कमी पडल्यामुळे परस्पर संबंध राखणे कठीण जाते.
  •  कारकीर्द म्हणजे करियर रिलेटेड.: असे ताण योग्य मार्ग न सापडणे किंवा कॅपॅसिटी कमी पडणे यातून उद्भभवतात.
  • संघटनात्मक वातावरण. :संस्थांमधील वर्तनावर बंधने व राजकारण.
  • कुटुंबांतर्गत ताण: यात विवाह अपत्यजन्म आजारपण घटस्पोट इत्यांदी
  • इतर घटक :यात छोट्या मोठ्या घटना प्रसंग नैसर्गिक आपत्ती पूर वादळ भूकंप वगैरे. कसं जगायचं ताणमुक्त आयुष्य हे बघावे लागेलच !

फ्रेंड्स ! पण सध्या तरी असू देत की ताण उत्पन्न करणारे स्त्रोत असंख्य ! पण” मित्र-मैत्रिणींबरोबर चहाचा एक कप किंवा कॉफी तो बनतीही है daily ! “एवढा वेळ आपण ठेवायलाच पाहिजे.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोंथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER