” ताणाचे धनुष्य ताणावे तरी किती ?”

tension

काल परवाच्या लेखांमध्ये आपण म्हटलं होतं की ताण कुणा कुणाला नाही? आणि रामदास स्वामी प्रमाणे उत्तर मिळाले होते, “असा या भूमंडळी तुच शोधुन पाहे !” ताणाप्रमाणे परिस्थिती असो की नसो प्रत्येकाच्या समायोजन क्षमतेनुसार हा ताण जाणवत असतो. म्हणूनच तो व्यक्तिपरत्वे भिन्न असतो. म्हणजे १० – ११ लोक, पाहुणे म्हणून एक दीड तासात जेवायला येणार आहेत, म्हंटल्यावर एखाद्या गृहिणीला टेन्शन येईल तर दुसरी पटापट कामांचे नियोजन करून पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज राहील. हा ! मग ताणा शी जुळवून घेण्याचे मार्ग भले वेगवेगळे असतील. पहिली गृहिणी कदाचित काहीतरी किचकट मेन्यू आखेल, नाहीतर घराच्या साफसफाई मध्ये खूप मेहनत करून थकून जाईल, तर दुसरी काही मोजकेच सोपे पण सुटसुटीत आणि छान पदार्थ करेल आणि स्वीट्स बाहेरून मागवेल. म्हणजे ताणाचे हे धनुष्य किती ताणावं हे प्रत्येक जण आपापले ठरवत असते मात्र ताण कधीच येत नाही अशी व्यक्ती फार विरळी !

माणूस उत्क्रांत होत असताना, त्याची उत्क्रांती ची मुलुखगिरी ही उपनिषदे, वेद, गीता, दासबोध, संत साहित्यातून, मानसशास्त्रातील विचार भावना व वर्तन यांची स्टेशन्स घेत धावताना दिसते. या प्राचीन ग्रंथ व मानसशास्त्र यातील साम्यस्थळे जाणवतात, गीतेतील कृष्ण अर्जुन संवाद, रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज किंवा कल्याण स्वामी यांच्याबरोबर चे संवाद कौन्सिलर आणि कौन्सिली सारखे वाटू लागतात .

परमभाग्य ची गोष्ट वाटावी ,अशी की विविध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली सूत्रे ही उपलब्ध ज्ञानावर, थोड्या वेगळ्या दिशेने चिंतन करून एकजिनसी सूत्रात बांधलेली आहेत, असं म्हणता येईल आणि त्यासाठी त्यांनी प्राचीन तत्वज्ञाना पर्यंत फेरफटका मारला असे जाणवते. तसेअसे प्रत्यक्ष संदर्भ नसले तरी विचार साधर्म्य जाणवतेच.

उत्क्रांतीच्या काळातील ज्ञानामुळे मानवाचे अस्तित्वविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यासाठी उपकरणांचा विचार झाला. परंतु पुढे त्यातूनच माणसाने अमूर्त कल्पना मांडणे आणि विकसित करणे सुरू केले. ही प्रगती आपल्याला उपनिषदातील वेदांत सूत्रात दिसते. तीच पुढे मौखिक परंपरेने आणि नंतर लिखित स्वरूपात पुढच्या पिढ्यांपर्यंत सोपवली गेली.

थोडक्यात काय? तर ताण तणाव ही एक पूर्ण विश्वाला व्यापणारी समस्या आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या स्वरूपात ती समोर उभी राहते. परंतु ताण हा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतो. नकारात्मक ताणाचे परिणाम वाईट असले, तरी ताणच जर नसेल आपली प्रगती होऊ शकणार नाही. मला सांगितलं की आता client नाही, लिखाण नाही , घर कामही नाही. हवें तेवढे झोप ! मला दोन दिवस, चार दिवस मजा येईल. नंतर माझ्या हातून कुठलंच काम होणार नाही .माझी बुद्धी शक्ती वाया जाईल. उलट ते जर मला सांगितला आहे, दुपारच्या साडे तीन पर्यंत दररोज एक आर्टिकल मला पाठवायचं आहे, अशावेळी मला ताण नक्की येईल, पण एक सर्जनशीलतेची कृती सकारात्मक काम माझ्याकडून घडेल, ज्याने माझ्या बुद्धीचा उपयोग होईल होईल आणि नवनिर्मितीचा आनंद ही मिळेल. हा झाला सकारात्मकता ताण !

पण मुळात, मला आणि ताण ? नाहीच मुळी. अजिबात नाही. माझं कसं सगळं आलबेल सुरू आहे. असा आपण बरेचदा ताणाला मान्यच करत नाही. का? नॉर्मल नसल्यासारखा वाटतं ? लोक काय म्हणतील असं वाटतं?. एखाद्या दिवशी मूड चांगला नसला, कसला ताण असला तरी कुणी येणार म्हटलं, की पटापट घरातला हॉल आवरून रडके डोळे व चेहरा धुवून, पावडर लावून हसत बाहेर येतो ना आपण ? हॉलमधल्या पसारा जितक्या वेगाने आतल्या खोलीत टाकतो , तितक्याच कुशलतेने मनातले कल्लोळ ही मनात मागच्या बाजूला टाकतो. (बॅक ऑफ द माईंड ) हे सत्य आपण का स्वीकारत नाही सर्वसाधारण लोकांसारखा सर्व कर्तव्य पार पाडणारा समाज संमत वर्तन करणार, लोकप्रिय वर्तन असणारा ,श्रीमंत या चौकटीत आपण फिट्ट बसायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच हा ताण वाढत जातो. साठत जातो व त्याचा भडका उडतो जो जास्त त्रासदायक असतो त्यातून प्रचंड भावनिक ओढाताण व कुचंबणा होते.

मग काय करायचं ? तर ताणा चा स्वीकार करायचा !

१) मी पण एक व्यक्ती आहे.म्हणूनच माझा माझ्याशी संवाद मैत्रीपूर्ण व अर्थपूर्ण व्हावा. माझा स्वीकार !

२) इतरांचा सहज स्वीकार. यात जबरदस्ती वाटायला नको. भोवतालच्या व्यक्ती किंवा परिस्थिती, नेहमीच परिपूर्ण असतील अशी अपेक्षा न ठेवता आता फक्त आणि फक्त स्वतःचे आत्मपरीक्षण करायचे.
ट… ट…. टेन्शन वाला असा हा ताण म्हणजे नेमका काय? तर ” व्यक्तीच्या शारीरिक मानसिक कार्याबाबत धोका निर्माण करणाऱ्या वा प्रत्यक्ष बिघाड उत्पन्न करणाऱ्या घटनांना दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे ताण !”अशा शास्त्रीय व्याख्या आहेत.

पण हा ताण उत्पन्न कसा आणि कुठून होतो? त्याची लक्षणे कोणती ?तो येण्यासाठी कारण काय ठरतात? तो वाढतो कसा? त्याचे परिणाम काय ?आणि त्यावर उपाय काय ?हा विषय फार मोठा !

तो आपण बघू ही !

पण आज तरी मला वाटतं की की तुम्ही ताणाला नाकारू नका! मग टेन्शन आलय हे कसे ओळखाल? यासाठी आहेत आपल्याकडे काही सिग्नल्स ! समजा मनात एखादा विचार व भावना आली, त्याला 3 I आणि 2 P हे क्रायटेरिया लावायचे.

1) I — intensity तीव्रता.
2) I– interpersonal conflict आंतरिक संघर्ष.
3) I—interpersonal conflict इतरांशी संघर्ष .
4) P– persistent सतत, वारंवार
5). P– pervasive पोखरणारी.

कुठल्याही भावना किंवा विचार किती तीव्र आहे, या किती सतत मनात येतात? सतत मनाला पोखरत कुरतडत आहेत का? यामुळे माझा माझ्याशी स्वतःशी सतत संघर्ष झगडा सुरू आहे का? किंवा इतरांशी सतत वादंग संघर्ष होतो आहे का ?

याची उत्तरे जर हो असतील तर आणि तीव्रताही जास्त असेल तर तुम्ही डोळे झाकून कुणाची तरी मदत घ्यायलाच हवी. ती एखाद्या प्रोफेशनल ची समुपदेशकाची किंवा खऱ्या जवळच्या माणसाची तरी ! आणि तसे ठिकाण जर नसेल तर व्यावसायिक तुमच्याच साठी नेहमी उपलब्ध असतात. त्यांच्याशी जरूर शेअर करावे कारण पण ते तटस्थपणे आपल्या प्रश्नाकडे बघत असतात तिथे आपल्या प्रश्नाबाबत गोपनीयता राखली जाण्याची ही खात्री असते. त्यामुळे पहिले सूत्र हे की की मदत मागायला मागे पुढे बघू नका.

( संदर्भ: ताणतणावांचे व्यवस्थापन: डॉ.आनंद नाडकर्णी.)

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER