पतंगाला ढील किती ? अन् कधी ?

Mansi

कालच्या लेखात बघितल्याप्रमाणे, आजकाल दैनंदिन धावपळीमध्ये आपल्याला बरेचदा पराकोटीची सहनशक्ती लागते. त्यामुळे घराकडे जेव्हा स्त्री पुरुष करतात त्यावेळी त्यांच्याकडे सहनशक्तीची वानवा असते आणि आपोआपच त्याचा परिणाम मुलांच्या बाबतीत प्रकर्षाने होतो.

सध्याच्या मानसशास्त्रासमोरील समाजाविषयक जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ,त्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पौगंडावस्थेतील मुलांविषयीचा प्रश्न असं म्हणता येईल. याला कारणही तसेच आहे. मानवी विकासाच्या काळातला हा अतिशय संवेदनशील असलेला काळ. आणि दुसरी गोष्ट उद्याची पुढची पिढी ही पण यातून आपल्याला दिसत असते. मानवी विकास प्रक्रियांमध्ये घडणीचा काळ पहिली सहा वर्षे असला तरी सहा ते बारा वर्षे हा शिस्त लावण्याचा काळ आहे. आणि पुढे 12 ते 18 पर्यंतचा काळ संक्रमणाचा कालखंड असून यामध्ये अनेक शारीरिक, मानसिक ,भावनिक बदल घडत असतात. याचवेळी बाहेरच्या जगातील आव्हाने देखील खुणावत असतात. यात कुठे कुठे धोकेही असतात तशा निसरड्या वाटाही असतात. या वाटांवरचे प्रश्नांचे स्वरूप एकच असले तरी त्यामधील गुंतागुंतीचे प्रश्न अनेक असतात. काही कमी अधिक गंभीर इतकेच ! या वयातील मुलांना समजून घ्यावे लागते. त्यासाठी सवड ,सहवास आणि संवाद या त्रयींची गरज असते.

परंतु बाहेरून घराकडे येताना आई-बाबांची सहनशक्ती ही जेव्हा संपलेली असते, अशा वेळी मुलांशी वागताना नकळत टोकाची भूमिका घेतली जाते .म्हणजे ज्या काळात त्यांना पालकांच्या समजूतदारपणाची गरज असते ,त्याच काळात पालकही हेकेखोर वागतात. आणि अनुकरणक्ष्यम वयामध्ये नेमके हेच उचलले जाते. आणि आपोआपच जी गोष्ट हवी ती हवीचं ! आजच … आत्ताच्या आत्ता हवी ! अशी मागणी होऊ लागते. आणि काळाप्रमाणे हळूहळू हा स्वभावाचा भाग बनतो. असे हे कुमार अवस्थेतील प्रश्न म्हणाल, तर अगदी छोटे दिसतात पण दुर्लक्ष केल्यास ज्या प्रमाणे काट्याचा नायटा होतो त्या पद्धतीने त्याचे स्वरुप बदलत जाते. जर पालक मुलांसाठी वेळ देऊ शकत नसतील तर त्याबाबतची खंत आणि अपराधीभाव त्यांना कायम भरून राहिलेला असतो. त्यामुळे तो भरून काढण्यासाठी, अनेक मोठ्या मोठ्या वस्तू घेऊन दिल्या जातात. पण सुसंवादातून, प्रेमातून ,मिळणारा आधार, स्थैर्य ,शांतता ,समंजसपणा हा अशा वस्तू मिळवून कसा देणार ?

बरेचसे बदलही या काळात होत असतात, की ज्याचा परिणाम या वयातील मुलांच्या दिनचर्यावर, वर्तनावर होताना दिसत असतो. साधारण याच काळात म्हणजे सातवीपर्यंत हुशार मुलगा त्याचे गुण अचानक आठवीनंतर घसरणीला लागलेले दिसतात. अतिशय चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी पिअर प्रेशर मुळे व्यसनाच्या आहारी जातो, तर काही मुले गॅजेट्स च्या आहारी जातात.

आज-काल ,आमचा मुलगा / मुलगी सकाळी उठतच नाही ,लोळत राहतो/,राहते. मागे लागल्याशिवाय अंघोळ करत नाही, नाश्ता करत नाही, कुणाशी जास्त बोलत नाही. एकटाच बसलेला असतो./असते. असे वागण्यातला बदल आई-वडील घरी असतील तर लक्षात येतात नाही तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर लक्षात येतात. आणि अशा तक्रारी घेऊन पालक जेव्हा समुपदेशनासाठी येतात. त्यावेळी बऱ्यापैकी लक्षणे वाढलेली असतात. हे सांगण्या मागे कारण असे की बरेचदा सिझोफ्रेनिया, बायपोलर डीसऑर्डर यासारख्या आजारांची सुरुवात पंधरा वर्षे पासून पुढे होत असते. परंतु त्याचे निदान लवकर होत नाही .कारण मुलाला शिंगं फुटली, होईल हळूहळू लेकरू शहाणे किंवा या वयाचा परिणाम वगैरे म्हणून थोडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सजग राहणे खूप आवश्यक आहे. म्हणूनच हे झोपून झोपून रहाणे, आणि लवकर न आवरणे, परत परत तीच कृती करणे, उगीचच रडणे, चिडणे या गोष्टींची वेळीच दखल घ्यावी. अर्थात प्रत्येकच वेळी लगेच मानसिक आजार असतो असे नाही हेही लक्षात ठेवायला हवे. ( ही गोष्ट खूप महत्वाची. कारण मुलांच्या बाबतीत आजकाल पालक अतिशय संवेदनशील झालेले आहेत. त्यामुळे लगेच सूतावरून स्वर्गाला जाऊ नये.) फक्त लक्ष असणे आवश्यक आहे हा हे सांगण्यामागचा उद्देश.

पालकांच्या नजरेआड असणाऱ्या या मुलांचं नेमकं काय चाललंय हे आजकाल लवकर लक्षात येत नाही .त्यामुळे जाणवणार्‍या वर्तन बदलांमुळे पालक त्रस्त असतात. “घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी,” याप्रमाणे त्यांचं सतत लक्ष आपल्या मुलांवरती फिरत असतं. एकूणच प्रेम प्रकरणे, अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, पुन्हा पुन्हा होणारे ब्रेकअप, मत्सर ,तिरस्कार ,घरातून पळून जाण्याचे धमक्या, आत्महत्या इत्यादी प्रश्नांबरोबरच बुजरेपणा,निरुत्साह, परीक्षेचे टेन्शन ,करिअर विषयक दडपण ,काही महत्त्वाच्या गोष्टी या बरोबर असतातचं. यातील सगळ्या गोष्टींसाठी भावनिक सुधारणा गरजेची आहे. मूल्यसंस्कार त्याचा सहभाग आहे काही प्रमाणात.

या सगळ्यांमध्ये मुले ,पालक व एकूणच समाज भरडला जात असतो. म्हणून केवळ काळजी करण्यापेक्षा योग्य वर्तनाचे मूळ एखाद्या कारणात असते हे वेळीच लक्षात घ्यायला पाहिजे. जबाबदार कारणाचा लवकरात लवकर शोध घ्यायला हवा. आई-वडिलांमधील होणारे सततचे संघर्ष, त्यांच्या नोकरी व्यवसायामधील तोटे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू याला जबाबदार असतात. अशी अनंत कारणे यासाठी आहेत. त्यामुळे वर्तन बदल जाणवल्या बरोबर कारणांचा धांडोळा घेणे आवश्यक असते आणि पालकांनी समाजाचा भाग म्हणून या प्रश्नांचा वेध घेणे आणि त्या बाबतीत पाऊल उचलणे , विचार करणे ही आपली जबाबदारी आहे.

असा हा वाऱ्यावर भरारी घेणारा, मुलांच्या आयुष्याचा पतंग याला आकाशाकडे झेप तर घेऊ द्यायची पण त्याच वेळी याच्या दोराला केव्हा ढील द्यायची ?आणि केव्हा नाही ? हे आपल्यालाच ठरवावें लागते. त्यासाठी कारणांचा शोध घेऊन ,सवड काढून ,वेळ काढून आपला सहवास ,त्यांना मिळवून देणे आणि सुसंवाद साधणे यानेच प्रश्न सुटू शकतात. हे करत असताना वेळ वाया जाणार नाही आहे तर भारताची पुढची पिढी आपण घडवणार आहे.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER