पाच वर्षांत संघाला किती वाटा दिला? पटोलेंचा फडणवीसांना सवाल

Devendra Fadnavis - Nana Patole - Maharashtra Today

मुंबई : गृहमंत्र्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला (Sachin Vaze) १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. याबाबत काँग्रेस (Congress) का बोलत नाही? काँग्रेसलाही वाटा दिला जातो का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनाच हप्तेखोरीचा अनुभव आहे. यांनी पाच वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किती वाटा दिला? असा सवाल केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार केला. “वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीसांना आहे. ते त्यांचा अनुभव कथन करतात. पाच वर्षे सत्तेत असताना मंत्रालयात संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व किती वाटा संघाला जात होता, याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.” असे पटोले यांनी सांगितले.

फडणवीस खोटे बोलतात
फडणवीस हे सत्तेत असताना रश्मी शुक्ला यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना किती वाटा द्यायचा, याचा चांगलाच अनुभव मिळवला. भाजपाने आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. मविआ सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे. फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरू आहेत. फडणवीस हे सर्वांत मोठे खोटारडे आहे. ते विधिमंडळातसुद्धा खोटे बोलतात, अशी टीका पटोलेंनी केली.

परमबीर सिंग (Parambir Singh) प्रिय कसे?
भाजपा (BJP) कालपर्यंत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीका करत होती, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, याची माहिती आम्हाला आहे. खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, त्यांचा एफआयआर दाखल करण्यातही परमबीर सिंग यांनी टाळाटाळ केली होती. त्यांची भूमिका संशयास्पद होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून सुरू असलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. “मी सरकारमध्ये असतो, तर परमबीर सिंग यांनी केलेल्या वर्तणुकीनंतर त्यांची बदली केली नसती, तर थेट निलंबित केले असते.” असेही पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER