नेहमीच चर्चेत असलेल्या गोपीचंद पडळकरांचा कसा आहे राजकीय प्रवास?

How is the political journey of the always talked about Gopichand Padalkar?

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar). धनगर समाजातील नेत्यांपैकी एक महत्वाचं नाव. गाडीच्या बोनेट वर उभं रहात भाषण देण्यापासून पासून सुरुवात झालेलं गोपीचंद पडळकरांचं राजकारण नेहमीच प्रकाशझोतात राहिलं आहे. शरद पवारांवरच्या वक्तव्यानंतर ते कोरोनाच्या काळातही चर्चेत राहिले आहेत.

कसा आहे पडळकरांचा राजकीय प्रवास

गोपीचंद पडळकरांच्या राजकारणाला सुरुवात झाली महादेव जाणकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर महादेव जाणकारांनी तेव्हा धनगर समाजाला आकर्षित करून घेतलेलं होतं. धनगर समाजातूनच येणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी २००९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. गाडीच्या बोनेट वर उभं राहून आपल्या खास शैलीत भाषण देणारे गोपीचंद पडळकर हळू-हळू जनमानसात, मुख्यतः धनगर समाजात प्रसिद्ध होऊ लागले आणि रासपमधील धनगर आंदोलनातलं महत्वाचं नाव म्हणून ओळखले जाऊ लागले.

२०१४ च्या निवडणुकी आधी भाजप आणि नरेंद्र मोदींचे (Narendra Modi)वारे वाहायला सुरुवात झाली होती. धनगर समाजात पडळकरांचं नाव झालं होतं. या सगळ्या परिस्थितीत २०१३ ला गोपीचंद पडळकरांनी भाजप मध्ये प्रवेश केला. सांगली जिल्ह्यात २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच हवा होती. पण या हवेला सुरुंग लावण्याचं भाजपसाठी महत्वाचं काम गोपीचंद पडळकरांनी केलं. मोदींच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या एका जाहीर सभेत गोपीचंद पडळकरांनी सांगलीचे तत्कालीन खासदार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आणि धनगर समाजाची मतं भाजपकडे वळवून घेतली. या सभेत पडळकर म्हणाले, ” प्रतीक पाटील जत मधल्या एका सभेत म्हणाले, की धनगर समाजाला कुठे अक्कल असते, धनगर समाज आधीच खूप अडाणी आहे. आशा नेत्यांना आपण मत देणार का ?” पडळकरांच्या त्या भाषणाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. मोदींनीही धनगर आरक्षणाचं आश्वासन धनगर समाजाला दिलंच होतं. ते आश्वासन लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम पडळकरांनी केलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा परंपरागत धनगर मतदार भाजप कडे वळला. सांगली मतदार संघातून निवडून येऊन भाजपचे संजयकाका पाटील खासदार झाले आणि याचं श्रेय पडळकरांना मिळाल्यामुळे भाजप मध्येही पडळकरांना धनगर समाजाचा चेहरा म्हणून बघितलं जाऊ लागलं. पुढे २०१४ ची विधानसभा निवडणूक पडळकरांनी लढवली पण ते निवडून येऊ शकले नाहीत. इथून निवडून न येण्यामागे भाजपचे खासदार संजयकाका पाटलांचा हात आहे अशी पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये यायला लागल्या आणि पडळकरांच्या पक्षांतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. पडळकरांनीही माध्यमांसमोर संजयकाका पाटील आणि त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचं मान्य केलेलं आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यातला वादही जगजाहीर आहे. आर. आर. पाटलांचा पडळकरांना संपवल्याचा डाव असल्याच्या आशयाची विधानं पडळकरांनी अनेक सभांमध्ये केली आहेत.

२०१४ ते २०१९ च्या निवडणुकी दरम्यानच्या काळात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता. भाजप सरकार धनगर आरक्षण देण्यास असमर्थ ठरलं होतं. पडळकरांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कडून तिकिट मिळण्याच्या शक्यता मावळत आल्या होत्या. धनगर आरक्षणाचा चेहरा असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर त्यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री असूनही धनगर आरक्षणासंबंधात काहीही करू शकलेले दिसत नव्हते. अशा पार्श्वभूमीवर धनगर समाजाचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळरांनी इतर पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींकडून सांगली लोकसभेचं तिकीट मिळावं या साठीही प्रयत्न केले पण तिथून त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. आशा सगळ्या परिस्थितीत लगेचच त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या नव्याने उभारी घेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आणि वंचित कडून सांगली लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरले.

वंचित बहुजन आघाडीत आल्यानंतर चर्चा झाली ती पडळकरांच्या भाषणांची. एका जाहीर सभेत बोलताना पडळकरांनी भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली. भाजप सरकार आपल्याला आरक्षण देऊ शकलं नाही म्हणून आपण भाजपला मत देता कामा नये, मीच काय पण माझी आई किंवा भाऊ कुणीही भाजप मध्ये प्रवेश केला तरीही भाजपला आणि मला मत द्यायचं नाही अशी शपथ त्यांनी धनगर समाजाला घातली.

वंचित बहुजन आघाडीत धनगर समाजाचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकरांकडे पाहिलं जाऊ लागलं पण वंचितचे काही नेते व कार्यकर्ते मात्र पडळकरांच्या वंचित मधील प्रवेशाने आणि लोकसभेचं तिकीट पडळकरांना मिळाल्याने नाराज झाले. वंचित आणि शोषित घटकांच्या विकासाचे मुद्दे घेऊन मैदानावर उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैचारिक शत्रू आहेत हे आता सगळ्यांसमोर आलं होतं. मात्र अशाच वातावरणात पडळकरांना झटका बसला. गोपीचंद पडळकरांचे संघाच्या गणवेशातील आणि संभाजी भिडेंसोबतचे काही फोटो व्हायरल झाले आणि वंचितच्या नेत्यांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना ही बाब खटकली. विरोधकांनी ही वंचितवर हल्ला चढवला. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेल्या लोकांना तिकीट देऊन दलित मागासवर्गीयांची फसवणूक करते आहे असं काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सभांमध्ये बोलू लागले. वंचित मध्येच असलेले जेष्ठ लेखक लक्ष्मण मानेंनीही पडळकर आणि प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आणि पक्ष सोडला, पक्ष सोडण्यामागची इतर करणंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली आहेतच परंतु संघासोबत संबंध असलेल्या पडळकरांसारख्या लोकांना तिकीट आणि पद देणं महत्वाचं कारण ठरलं.

पडळकरांनी वंचित कडून निवडणूक लढवली पण भाजपच्या संजयकाका पाटलांच्या विरोधात निवडून येऊ शकले नाहीत. पडळकर विजयी झाले नसले तरीही 3 लाख 234 मतं घेऊन वंचितच्या एकूण उमेदवारांपैकी सर्वाधिक मतं त्यांनी मिळवले होते. वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरली नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले. पडळकरांनी वंचितला ‘जय मल्हार’ केला आणि पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. पडळकरांची भाजप प्रवेशाची सभाही चांगलीच गाजली होती. गोपीचंद पडळकर पुन्हा घरी परतले आहेत, “गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहेत, ते बारामतीतून लढतील आणि बारामती आपण जिंकून घेऊ” असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सभेत जाहीर केलं. बारामती विधानसभा अजित पवारांच्या विरोधात लढवणं सोप्पी गोष्ट नव्हती, आणि झालंही तसंच. अजित पवारांच्या विरोधात पडळकर अवघी ३० हजार २८२ मतं मिळवू शकले आणि त्यांचं डिपॉझिट जावोत झालं. पडळकरांनी धनगर समाजाला घातलेली बिरोबाची शपथ खरी ठरली अशा आशयाच्या विनोदांनीही त्यावेळी समाज माध्यमं व्यापून घेतली होती.

ऐन निवडणुकीच्या काळात पडळकरांनी ‘धुमस’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करून त्यात अभिनयही केला होता. परंतू आचारसंहितेमुळे त्याचं प्रदर्शन थांबविण्यात आलं होतं. आपले प्रश्न आणि आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चित्रपट हे मोठं मध्यम आहे याच विचारातून ‘धुमस’ ची निर्मिती केल्याचं पडळकर सांगतात.

काही दिवसांपूर्वी, “शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कोरोना आहे” असं विधान करून पडळकर पुन्हा चर्चेत आले होते. अनेकांनी या घटनेनंतर पडळकरांवर टीकेची झोड उठवली. भाजपने ही पडळकरांच्या या विधानाचं समर्थन केलं नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण राजकारण उभं असताना पडळकरांची यापुढील कारकीर्द कशी असेल हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER