राज्यपाल कोश्यारी कसे आहेत?

Bhagat Singh Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सार्वजनिक, राजकीय जीवनामध्ये गेली ५० वर्षे सक्रिय अव्याहत कार्यरत आहेत. उत्तराखंडचे एक अत्यंत प्रभावी नेते असा त्यांचा परिचय. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की, नेपाळमध्ये पंतप्रधानांपासून अनेक नेते हे कोश्यारी यांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत. लोकसभेचा त्यांचा मतदारसंघ नेपाळला लागून होता. त्यातून हे ऋणानुबंध तयार झाले आणि आजही ते कायम आहेत.

कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. स्वयंशिस्त हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ते रोज पहाटे साडेतीन-पावणेचारला उठतात आणि स्वयंशिस्तीची पहिली सुरुवात होते ती स्वतःच्या हाताने चहा तयार करून घेण्यापासून.

कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले व प्रदेश भाजपचे अध्यक्षदेखील होते. नंतर ते राज्यसभेचे सदस्य राहिले आणि ऑगस्ट २०१९ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. २००८ मध्ये त्यांच्याच नेतृत्वात भाजपने उत्तराखंडमध्ये सत्ता मिळवली; पण त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. शिस्त आणि पक्षनिष्ठेचे पाईक असलेले कोश्यारी यांनी कुठेही खळखळ केली नाही. पुढे ते राज्यसभेवर गेले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर सहा दशके अविचल श्रद्धा ठेवून कार्यरत असलेले ते एक दुर्मिळ नेते आहेत. “आपण देशाचे पंतप्रधान होऊ शकला असता, आपल्यात ती क्षमता निश्चितच होती.” असे परवाच्या भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारी यांना म्हटले ते काही उगाच नव्हे. उथळ लोक कोश्यारी यांची तुलना रामलाल यांच्याशी करू शकतात, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनवू नये, अशी धमकीवजा भाषाही वापरू शकतात; परंतु त्यांची क्षमता व निष्ठा याची पूर्ण माहिती असलेले शरद पवार यांच्यासारखे लोक काय बोलतात ते अधिक महत्त्वाचे आहे.

राज्यावर कोरोनाचे भीषण संकट असताना संवेदनशील राज्यपालांनी स्वतःचा एक महिन्याचा पगार आणि वर्षभराचा ३० टक्के पगार पंतप्रधान निधीला मदत म्हणून केव्हाच जाहीर केला. आता त्यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. राजभवनाच्या खर्चात कपात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. राजभवनासाठी स्वतंत्र आस्थापना असावी अशी मागणी राज्यपालांनी करताच त्यांच्यावर तुटून पडणारे खळखळाटी वीर कमी नाहीत. त्याच राज्यपालांनी राजभवनातील बडेजावाला फाटा दिला आहे, हे मात्र विसरले जाते. काय केले त्यांनी? त्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू करण्यात येऊ नये, पुढील आदेशांपर्यंत राजभवनात देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतिचिन्ह देऊ नयेत, पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करू नये, स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा होणार नाही, राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी, राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवरपॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये. हा सगळा साधेपणा स्वीकारण्यासाठी देशहिताची जाणीव असलेली वृत्ती असावी लागते, ती राज्यपालांमध्ये पुरेपूर आहे.

लॉकडाऊनच्या काळात तर त्यांनी मराठी मातीशी एक वेगळेच नाते जोडले आहे. दोन महिन्यांपासून ते चक्क मराठी शिकत आहेत. त्यासाठी त्यांनी शिकवणी लावली आहे. रोज ते मराठीचे धडे गिरवतात. ७८ वर्षांचे कोश्यारी मराठीचे विद्यार्थी बनले आहेत. उत्तराखंडमधून आलेल्या या नेत्याने मराठीशी आपली नाळ जोडली आहे. आता ते थोडे थोडे मराठी बोलू लागले आहेत. मराठी मराठी म्हणून कंठशोष करणाऱ्यांनी मराठीसाठी काय केले हा तसा संशोधनाचाच विषय. मात्र १६०० किलोमीटरवरून मुंबईत आलेले कोश्यारी यांनी मराठी सेवा-भक्तीचा यज्ञ मांडला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER