हे किती महत्त्वाचं बरं ?

Mansavad

आठ दिवसांपूर्वी बरी असलेली रिया आज परत माझ्याकडे आली .कालच तिच्या मिस्टरांचा फोन आला .रिया खूप चिडचिड करते आहे. आताही बोलत होती, “मला ना खोटेपणाने बोललेलं, वागलेलं अजिबात आवडत नाही. बाकी कुठलीही गोष्ट मी सहन करू शकते “.समोरच्या व्यक्तीच्या कुठल्यातरी न आवडणाऱ्या गोष्टींवर आपल मनस्वास्थ ठरवण, खरतर खूपच धोकादायक.

अशी कित्येक उदाहरणे मला नजरेसमोर दिसू लागली की ज्याने व्यक्ती आपल्या जीवाला खूप त्रास करून घेतात. त्यांच्या मन: शांतीवर एकूणच आरोग्यावर खूप परिणाम तर होतोच ,पण संपूर्ण आयुष्यावर प्रचंड परिणाम होत असतो. तेवढ्यावरच ते थांबत नाही तर आपल्या सभोवतालच्या जिवाभावाच्या व्यक्तींनाही फार मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो. त्या व्यक्ती तर अक्षरशः भरडल्या जातात.

समोरच्या व्यक्तीच्या काही सवयी ,लकबी ,खोडी आपल्याला आवडत नाहीत ,बोचंतात .किती ही सवय केली ,दुर्लक्ष केलं तरी नाही सहन होत .इथे कदाचित आपला अहंकार आडवा येतो. मी स्वतःला खूप भारी किंवा खास समजत असतो किंवा असते .अशावेळी माझ्यातही अशा काही सवयी आहेत का? खोडी, स्टाइल्स आहेत का ?ज्याचा दुसऱ्यालाही त्रास होत असेल ,चुकीचे वाटत असतील, अयोग्यही असतील ,हे सगळं समजत असतं पण उमजत नसतं. दुसऱ्यांच्या सवयीमुळे माझ्या मन: शांतीचा बळी देण्याइतका महत्त्वाचं हे नक्कीच नसतं. आणि मग आपण ट्रीगर होतो. म्हणूनच जॉन केनिथ गॅलब्रेथ यांनी म्हटलं आहे की” काय महत्त्वाचं आहे हे समजण्या इतकेच काय महत्वाचे नाही हे समजणे ही खूप महत्त्वाचे असते.!”बरेचदा आपले मनस्वास्थ्य कसे आहे यावरही आपण आजूबाजूच्या घटनांकडे बघत असतो.

माझ्या एका मैत्रिणीचे घर लहान, तिच्याकडे तिच्या सासुबाई होत्या. त्यांची एक सवय की त्या गाणं गुणगुणत पॅसेजमधून या खोलीत डोकव, त्या खोलीत डोकव असे करत फिरायच्या, घरात मदत काडीचीही नाही. अगदी पहिल्यापासूनच. अशावेळी तिला फोनवर काही बोलायचं असेल ,काही थोड्यावेळ खोलीत वाचत लोळत पडायचं असेल तर त्यांच्या अशा सवयीमुळे ते त्रासदायक व्हायचं. मोकळ बोलता न आल्याने घुसमट व्हायची, पूर्वी तर मोबाईलही नव्हते ,बाहेर गच्ची वर जाऊन फोन करायला !त्या कदाचित त्यांचे मन रमवत असतील किंवा विशिष्ट वयात रिकामपण झाल्याने सगळीकडे काय चाललंय? हे आपल्याला कळलं पाहिजे ही प्रवृत्ती होत असते. पण ही बहुतेक वेळा कळत नाही आणि समोरच्याची चिडचिड च होते. आपण कुठल्यातरी टेन्शनमध्ये असतो किंवा आपली तब्येत ठीक नसते, पण समोरची व्यक्ती अशीच गुणगुणत असेल तर चिडचिड हमखास होते.

बऱ्याच घरांमधून सूने समोर काही विषय बोलले जात नाही. तिथे ती येताच ते बंद होतात हे तुझं घर म्हणत असतानाच अशी वागणूक तिला त्रासदायक होते. बरेचदा सुने कडून काही गोष्टी शिकणे,ऐकणे किंवा हटकल्या जाणं हे पचायला जड जातं .सुनेत्रा तिच्या सुनेला नेहमी सांगते की अगं बेटा ,घरासाठी पडदे तु सिलेक्ट कर .तुझं घर आहे हे !डेकोरेशन कसं करायचं वगैरे सांग. पण सून अतिशय स्वच्छतेची, वास्तविक सुनेत्रालाही स्वच्छता आवडते, पण एकत्र कुटुंबात तिने आपल्या आवडींना वजा करत आणलं आहे.

एक दिवस एकत्र स्वयंपाक करताना तिने पदार्थ ढवळून चमचा ओट्यावर टेकवला. सुन म्हणाली आई चमचा कशात तरी ठेवा ना ! तेव्हा सुनेत्रा पटकन म्हणाली,” हे बघ माझ्या घरी मला माझ्या पद्धतीने करू दे, तू तुझ्या घरी (म्हणजे नोकरीच्या गावी )कर काय करायचे ते.” किती विरोधाभास होता सुनेत्राच्या वागण्यात. पण त्यामागेही कारण होतच की आत्तापर्यंत सासरच्या पद्धतीने तिने स्वतःला वळण लावत आणलं होतं आणि आता सून शिकवायला लागली होती हे नैराश्य तिचं निघत होतं. नंतर तिने सुनेला सॉरी पण म्हटले, पण सुनेचा राग जायला वेळ लागलाच.

काही व्यक्ती फाडफाड बोलून देतात .त्यांच्या मनात नंतर काही राहत नाही ही गोष्ट वेगळी. पण मने दुखावली जातात .तसेच काहीजण अजिबात बोलत नाही ,मनात ठेवतात पण समोरच्याने समजून घ्यावं ही अपेक्षा ही करतात. बऱ्याच प्रकारची माणसे आपल्याला आजूबाजूला दिसतात. काही जण आयत्या पोळीवर तूप ओढून घेणारी ,तर काही काडीने औषध लावणारी, काही भोळ्याभाबड्या पणाचा मुखवटा घेणारी तर काही मुंगी होऊन साखर खाणारी, काही सहृदयतेचा दिखावा करणारी, तर काहीजण आपल्यातच रमणारी, झापड लावून, मी माझं मला च्या पलीकडे न बघणारी .बरेचदा तर वाटतं की पुस्तक वाचन बंद करून एक एक व्यक्ती नीट पारखत गेल तर अख्खी कादंबरी तयार व्हायची .

थोडक्‍यात व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रत्येक व्यक्ती युनिक असल्याने आपले वेगळेपण जपणारी .आपण जितक्या लोकांबरोबर राहून तितकी आपल्याला पावलापावलावर ठे चेवर ठेच बसायचीच. एका जागी जखम झाली की पुन्हा पुन्हा तिथेच होण्याची शक्यता जास्त. याचे कारण आपला वीक पॉईंट किंवा ट्रिगर पॉइंट समोरची व्यक्ती ओळखते आणि कदाचित ठरवून परत परत तसेच वागुही शकते.

फ्रेंड्स ! किती दिवस आपण असे धडपडणार आहोत? असे जेव्हा हा होईल तेव्हा स्वतःचे विचार करायचा की

  • “हे किती महत्त्वाचे” किंवा याचे महत्त्व किती ?
  • “माझ्यासाठी “हे किती महत्त्वाचे आहे ?
  • “माझ्या आयुष्याच्या दृष्टीने” हे किती महत्त्वाचे आहे ?

या दृष्टीने विचार करताना हे किती महत्त्वाचे या प्रश्नाचे उत्तर बरेचदा” हा! ठीक आहे!”ओके मी सोडून देऊ शकतो असे असेल .पण जेव्हा माझ्यासाठी हे किती महत्त्वाचे त्यावेळी मात्र तो प्रश्न ,ताण, संकटं खूप मोठे स्वरूपात समोर उभे राहतील आणि प्रसंग बाका आहे असंच वाटेल. पण एवढा त्रास, ताण सहन करण्याएवढी ही परिस्थिती, ही सिच्युएशन माझ्या आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे का ?

याचा विचार केल्यास लक्षात येतं की याचा माझ्या आयुष्यवर काहीही परिणाम होणार नाही. किंबहुना माझे आयुष्य हे पूर्णपणे माझ्या हातात असते. (काही अपवाद वगळता) त्या दैनंदिन शिल्लक घटनेचा स्वतःवर परिणाम करून घेणारेही आपणच असतो. म्हणूनच प्रत्येक कृती आणि प्रतिक्रिया देण्यापूर्वी, म्हणजे ॲक्शन अँड रिएक्शन देण्यापूर्वी , ” How important it is ?”हे माझ्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचे परिणाम करणारे ?असा विचार जरूर करायला हवा. एखादी परिस्थिती आत्ता आपल्या ताणात भर घालणारी असेलही तीच परिस्थिती कदाचित दोन वर्षानंतर एखाद्या महिन्यानंतर किंवा उद्याला सुद्धा, तेवढी महत्वाची नाही राहणार. मग माझ्या तब्येती साठी मी काय करू शकेल? छोट्या निरर्थक गोष्टींमध्ये खूप गुंतल्याने खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ उरत नाही का ?माझ्या जीवनात मी कृतज्ञता व्यक्त करावी अशा कित्येक गोष्टींचा विचार मी करतच नाही का ?असाही विचार करावा.

कुणी माझ्याकडे रागाने पाहिले ,ओरडून बोलले ,किंवा दुर्लक्ष केलं तरीही मी दुखावली जाते, खरतर या सगळ्याचा माझ्याशी संबंध असतोच असं नाही .पण तरीही ही संवेदनशीलता वा अहंभाव म्हणा प्रत्येक गोष्टीचा संबंध माझ्याशी लावण्याचा मी प्रयत्न करते. हा माझा वृथा अभिमान आहे सगळ्याच गोष्टींचा माझ्याशी संबंध असावा इतकी मी महत्त्वाचा/ ची नाहीच मुळी .माझी स्वतःविषयीची प्रतिमा ,महत्व ,आत्मविश्वास असेल तर इतरांच्या हातात रिमोट न देता मी ते ,त्यांचे विचार आहे म्हणून स्वीकारू नाही का शकणार ? एखादी वस्तू जागच्या जागी नसली ठेवली की मला नाही आवडत, ते गैरसोयीचं होतं .परंतु वस्तू जागच्या जागी न ठेवण्याचा इतरांचा स्वभाव असेल तर कायमस्वरूपी स्वतःला त्रास करून घेणं, चिडचिड, हे स्वतःच्या तब्येतीसाठी किती हार्मफुल आहे !त्याने आयुष्यात किती तरी व्याधी मागे लागू शकतात आणि म्हणूनच ह्याने माझ्या आयुष्यात किती फरक पडणार ? हा प्रश्न स्वतःला जागोजागी जरूर विचारा.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER