येऊ कसा तसा मी मालिकेत

Shalva Kinjawadekar

माणसाच्या आयुष्यात येणारी संधी ही कधी त्याचं आयुष्य बदलून टाकणारी किंवा त्याला लोकप्रिय करणारी ठरेल हे काही सांगता येत नाही. अनेकदा च ज्या वाटेला जायचं नसतं त्या वाटेकडे केवळ जाण्याची वेळ येत नाही तर ती तुम्हाला तुमच्या स्वप्नाकडे नेणारी वाट असते. कलाकारांच्या बाबतीत अनेकदा असं होतं की एखादी मालिका किंवा एखादी भूमिका त्यांना करायची नसते पण ती त्यांच्यासाठीच लिहिलेली असते आणि त्या भूमिकेने त्यांना कलाकार म्हणून प्रेक्षकांचं प्रेम भरभरून मिळतं. या गोष्टीचा अनुभव सध्या येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेचा नायक म्हणजेच शाल्व किंजवडेकर अगदी पुरेपूर घेत आहे. आठवड्याभरातच ही मालिका लोकप्रिय झाली आहे. खरे तर शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawadekar) ही मालिकाच काय तर तो इतर कोणतीच मालिकाच करणार नव्हता. याला सिनेमातच काम करायचा असल्याने त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. हो … नाही म्हणत त्याने या मालिकेला होकार दिला आणि आज ओंकार खानविलकर या नावाने तो घराघरात पोहोचला आहे. मुलगा असावा तर असा असं म्हणत घराघरातल्या आई वर्गाने त्याला पसंतीची पावती दिली आहे.

येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील ओंकार हा श्रीमंत घरचा मुलगा असून देखील श्रीमंतीचे कुठलेच चोचलेपण त्याच्या व्यक्तिमत्वात दिसत नाही. त्यामुळेच पहिल्या एपिसोडपासून ओंकार ही व्यक्तिरेखा अनेकांना आवडली आहे. मात्र या रूपात पडद्यावर दिसणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर ही मालिका करायला तयारच नव्हता. याबाबतचा एक किस्सा त्याने शेअर केला आहे.

तो सांगतो की मी पुण्याचा असल्यामुळे लॉकडाउननंतरही मी पुण्यातच थांबलेलो होतो. दरम्यान नव्या सिनेमासाठी माझी शोधाशोध सुरू होती. शिवाय मला वेबसीरीज मध्ये काम करायला खूप आवडत असल्यामुळे काही नवीन काम आहे का या निमित्ताने वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात होतो. या दरम्यान या मालिकेची टीम स्क्रीप्टवर काम करत होती. या मालिकेच्या निर्मिती संस्थेकडून मला फोन आला की आपण एक अशी मालिका करत आहोत आणि त्यासाठी तुम्ही काम कराल का ? सुरुवातीला मी नाही असं म्हणून सांगितलं होतं पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला स्क्रीप्ट पाठवतो त्याच्यावर एक ऑडिशन देऊन तुम्ही आम्हाला मोबाईलवर शूट करून पाठवा. हे ठीक वाटलं .. निदान यासाठी कुठे प्रवास करून जायचं नव्हतं म्हणून मी होकार कळवला आणि त्यांनी दिलेला संवाद मी शूट करून त्यांना पाठवून दिला. त्यानंतर मला पुन्हा काही दिवसांनी फोन आला कि या मालिकेसाठी आम्ही सगळे ठाण्यात आलो आहोत आणि तुम्ही ठाण्यात सेटवर या. खरे तर मला नाहीच असं म्हणायचं होतं पण का कुणास ठाऊक मला जावसं वाटलं आणि ठाण्यातील या मालिकेच्या सेटवर पोहोचलो. त्या ठिकाणी अगोदरच मालिकेतले बरेच कलाकार आले होते आणि त्यांनी मला घोळात घेऊन ,आपली खूप छान होईल .याची कथा खूप वेगळी आहे आणि खूप छान आहे. टीम छान जमून आलेली आहे आणि .तुझी देखील भूमिका खूप चांगली आहे आणि खूप छान मस्त काम करू. या सगळ्यांचा अविर्भाव असा होता की मी त्या प्रोजेक्टला होकारच दिलेला आहे. जणू मीभूमिका करतोय हे फायनल आहे. नंतर पुन्हा एकदा मी सेटवर सीन केला आणि तो सगळ्यांना इतका आवडला की सगळ्यांकडूनच मला असा आग्रह झाला की मी मालिका करावी. त्यानंतर मग काय झालं मला खरच माहीत नाही पण त्या सेटवरच्या सगळ्या कलाकारांचे बाँडींग आणि काम करण्याची पद्धत पाहिली आणि होकार देऊन टाकला. शेवटच्या क्षणापर्यंत मालिका करायचीच नाही असा विचार करत असताना ह्या मालिकेशी मी जोडला गेलो आणि आता खरंच मला माझा निर्णय योग्य वाटतो. कधीकधी आपण एकाच गोष्टीचा विचार करत असतो आणि त्याच गोष्टी मागे धावत असतो पण आपल्या आजूबाजूला अशा अनेक संधी असतात ज्या खरच आपल्याला कलाकार म्हणून पुढे नेण्यासाठी मदत करत असतात आणि त्यापैकी ओमकार ही भूमिका माझ्या आयुष्यात नेहमी लक्षात राहील अशी आहे.

शाल्व किंजवडेकरची ही पहिलीच मालिका असली तरी यापूर्वी त्याने अनेक नाटकांमध्ये तसेच वेब सिरीज आणि हिंदी मालिकांमध्येही काम केलेला आहे. शिवाय तो काही प्रादेशिक सिनेमांमध्ये देखील झळकलेला आहे. त्याचे नेहमीच असे स्वप्न राहिले आहे की त्याला मोठ्या पडद्यावरच काम करायचा आहे. आणि सध्या लोकप्रिय होत असलेल्या वेब सिरीज देखील त्याला सतत खुणावत असतात.

मालिकांमध्ये काम करण्याचे एक वेगळं तंत्र आहे असं त्याला वाटतं. तिकडे तुम्हाला पंधरा मिनिटात पाठांतर करून सीन ओके करून द्यायचा असतो. शिवाय मालिकांच्या शूटिंगचे वेळापत्रकदेखील खूप वेगळे असते. आणि या सगळ्या तंत्रामध्ये आपल्याला स्वतःला बसवणं हे कलाकार म्हणून आव्हान वाटत असल्यामुळेच मालिका करण्यासाठी माझ्या मनात थोडी धाकधुक होती. हे खूप चॅलेंजिंग काम आहे पण आता या निमित्ताने मी खूप शिकायला लागलो आहे. या मालिकेचा अनुभव कलाकार म्हणून माझ्या मला समृद्ध करेल असंही शाल्वने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER